पंकजा मुंडे यांच्या खात्याने केलेल्या २०६ कोटी रुपयांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने प्रत्येक खरेदीत कसा घपला झाला याची कागदपत्रेच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे मंगळवारी सादर केली. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध आरोपांची राळ उठविली होती, पण मुंडे यांच्या कन्येवर आरोप होत असताना पक्षाने थोडे दमानेच घेतल्याबद्दल राष्ट्रवादीतच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या निर्णयांत कसा गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाला याची कागदपत्रेच लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सादर केली. चिक्की पुरविण्याचे कंत्राट दिलेल्या कंपनीकडे पुरेशी यंत्रणा अस्तित्वात नसणे, आघाडी सरकारने या संस्थेकडून खरेदीस दिलेली स्थगिती ही सारी पाश्र्वभूमी असताना या संस्थेलाच कसे काय काम मिळाले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. खरेदीचे काम मिळालेल्या काही संस्थांनी दिलेले पत्ते खोटे आहेत. कारण त्या ठिकाणी तशा संस्था वा कंपन्याच अस्तित्वात नाहीत याकडे सावंत यांनी लक्ष वेधले आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांनी नकारात्मक भूमिका घेतली असताना पंकजा मुंडे यांनी स्वत:च्या अधिकारांमध्ये खरेदीला मान्यता दिली.
हे सारे प्रकरण बाहेर आल्यावर सचिन सावंत यांना दूरध्वनीवरून धमक्या देण्यात आल्या असून, त्यांच्या तक्रारीनंतर सावंत यांना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले आहे. मुंडे यांच्या कन्येवर आरोप होत असताना राष्ट्रवादीने मवाळ भूमिका घेतली आहे. युवक काँग्रेसच्या वतीने काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले किंवा काही नेत्यांनी पत्रकबाजी केली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी अशा छोटय़ा नेत्यांची आपण दखल घेत नाही, असे सांगत या विषयावर बोलण्याचे टाळले. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वा अन्य पहिल्या फळीतील नेत्यांनी भूमिका मांडलेली नाही.