गेल्या पाच महिन्यांपासून देशात आश्वासन आणि भाषणांची बिर्याणी खायला घातली जात असून त्यास जनता कंटाळली आहे. राम मंदिर उभारू न शकलेले आता नथुरामाचे मंदिर बनवू पाहात आहेत. एवढेच नव्हे तर एमआयएम हे शिवसेना-भाजपाचेच पिल्लू असून त्यांना थारा देऊ नका, असे आवाहन करतानाच येत्या १४ एप्रिल रोजी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित स्मारकाचे भूमिपूजन सरकारने केले नाही, तर पक्षातर्फे हे भूमिपूजन केले जाईल, असा इशारा काँग्रेसने रविवारी दिला.
 वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे राज्य प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज बब्बर आदींच्या उपस्थितीत झाले. या निवडणुकीसाठी आंबेडकरवादी मतदारांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मुद्दा काँग्रेसने पुन्हा एकदा पेटविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार १४ एप्रिल रोजी राणेंच्याच नेतृत्वाखाली भूमिपूजन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. एमआयएमला निवडणुका लढवून विकास करायचा नसून धर्माधर्मात केवळ तेढ निर्माण करायचे आहे. हा पक्ष म्हणजे युतीचेच पिल्लू असल्याची टीकाही या वेळी काँग्रेस नेत्यांनी केली.
मुंबईतील खेरवाडी येथे रविवारी वांद्रे पूर्व मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन सुशीलकुमार शिंदे, राज बब्बर यांच्या उपस्थितीत झाले. (छाया-केविन डिसूझा)