मान्सून माघारी फिरताना येत असलेल्या पावसाने दुसरा दिवसही गाजवला. मंगळवारची पुनरावृत्ती करत बुधवारी संध्याकाळी मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात जोरदार वाऱ्यांसह आलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांची त्रेधातिरपीट उडवली. पुढील दोन दिवस संध्याकाळचा हा पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.
बुधवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबईत पुन्हा एकदा सोसाटय़ाच्या वाऱ्याची सुरुवात झाली आणि मंगळवारच्या तडाखेबंद पावसाच्या अनुभवाने हादरलेल्या प्रवाशांनी सुरक्षित आसरा गाठण्यासाठी धावपळ केली. मंगळवारी दक्षिण मुंबईला झोडपलेल्या पावसाने बुधवारी पूर्व व पश्चिम उपनगर, ठाणे व नवी मुंबईकडे आपली दृष्टी वळवली होती. साधारण दोन तास विविध भागांत झालेल्या सरींनंतर पावसाने काढता पाय घेतला.
दरवर्षी मान्सून क्षीण होताना वातावरणात होणाऱ्या बदलातून संध्याकाळी पाऊस पडतो. हा बदल तीन ते चार दिवस टिकतो. जोरदार वारे, विजांचा कडकडाट यांच्यासह मुंबई आणि परिसरात पावसाच्या सरी पडल्या. पुढील दोन दिवसही असा पाऊस येण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
निर्देशांक ६० वर पोहोचला होता. ढगातील पाण्याच्या साठय़ानुसारर हा निर्देशांक वाढतो. साधारणत ३० च्या पुढील निर्देशांक हा पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो. ६० हा निर्देशांक मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या गारा पडण्याचे संकेत देतो.
नवी मुंबईत गारा; ठाणे-बेलापूर मार्गावर थैमान
नवी मुंबई व ठाणे परिसरात काही ठिकाणी गाराही पडल्या. तर ठाणे-बेलापूर मार्गावर तर पावसाने थैमान घातले होते. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारपीठीचा मारा झाला. वाऱ्याने जागोजागी वृक्ष उन्मळून पडले, तर काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावर रात्री उशिरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ढगांमधील पाण्याचा प्रचंड साठा, ढगांची उंची आणि ढगांच्या पातळीवर तापमान उणे अंश तापमान हे गारा पडण्यासाठी कारणीभूत ठरले. डॉप्लर काही ठिकाणी ढगांमधील परिवर्तनांक  निर्देशांक ६० वर पोहोचला होता.