प्रभावी वक्त्यांची महाराष्ट्राची परंपरा जोपासणाऱ्या ‘लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धे’ची प्राथमिक फेरी पुणे, अहमदनगर, रत्नागिरी आणि औरंगाबाद येथील जोरदार प्रतिसादानंतर आता मुंबईत रंगणार आहे.
राजकीय की सामाजिक सुधारणा हा वाद असो किंवा स्वातंत्र्यपूर्व चळवळ असो. स्वातंत्र्यानंतरचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा असो किंवा आणीबाणीचा काळ असो. या सर्व काळात आपल्या भाषणांनी मैदान गाजवणारे अनेक मातब्बर वक्ते महाराष्ट्राने देशाला दिले. देशाला राजकीय, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक दिशा देणाऱ्या वक्त्यांची हीच परंपरा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभतो आहे. ही स्पर्धा मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रत्नागिरी, अहमदनगर, औरंगाबाद आणि नागपूर या आठ केंद्रांवर होत आहे. आतापर्यंत पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि रत्नागिरी येथे प्राथमिक फेरी पार पडली आहे.
तरुणाईला ‘आव्वाज’ मिळवून देणाऱ्या या स्पर्धेची मुंबई विभागाची प्राथमिक फेरी मंगळवार, २७ जानेवारी रोजी एक्स्प्रेस टॉवर्स येथे पार पडणार आहे. सकाळी १०.३० पासून या फेरीला सुरुवात होईल. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस, भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहकार्याने आणि तन्वी हर्बल व जनकल्याण सहकारी बँक यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा निकाल त्याच दिवशी जाहीर केला जाईल. यात यशस्वी ठरणाऱ्या वक्त्यांना विभागीय अंतिम फेरीत सहभागी होता येईल.
‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेला राज्यभरातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादानंतर ‘लोकसत्ता’ने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महाविद्यालयांत दडलेल्या तरुण वक्त्यांना व्यासपीठ देण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून अडीचशेहून अधिक महाविद्यालयांतील ५००पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
प्राथमिक फेरीसाठी दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर स्पर्धकांना किमान आठ ते कमाल दहा मिनिटे भाषण करायचे आहे. विषयाचे सादरीकरण, भाषेचे सौंदर्य आणि समृद्धी आणि आशय या निकषांवर परीक्षण होणार आहे. या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या स्पर्धकांना विभागीय अंतिम फेरीत आपले वक्तृत्वगुण सिद्ध करावे लागतील. विभागीय अंतिम फेरीदरम्यान एका महनीय वक्त्याद्वारे मार्गदर्शनही करण्यात येणार आहे.

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाईस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर लोकसत्ता वक्तृत्व स्पर्धा होत आहे.