अपहृत मुलाच्या उदरभरण क्षमतेने अपहरणकर्त्यांच्या उरात धडकी
‘मेरे अपमान का बदला एक दिन मेरा बेटा जरूर लेगा..’ असा थरथरता डायलॉग चित्रपटात नायकाचा बाप उच्चारतो. त्यासाठी तो आपल्या मुलाला लहानपणापासून तयार करतो. मग हा मुलगा मोठा झाल्यावर ‘कसम पैदा करनेवाले की’ म्हणत बापाच्या अपमानाचा (क्लायमॅक्सला!) बदलाही घेतो. हिंदूी चित्रपटात शोभणारा हा प्रसंग. मुंबईतल्या एका तरुणाने आपल्यावरील अपमानाचा बदला घेण्यासाठी अशाच एका हिंदी चित्रपटातून प्रेरणा घेतली. अडचण एकच होती, अविवाहित असल्याने मुलाची काय ती उणीव होती. मग त्याने चक्क अपहरणाचीच क्लृप्ती वापरून एक छोटा मुलगा ‘पैदा’ केला! या मुलाला धष्टपुष्ट करायचा विडा त्याने उचलला खरा, पण अवघ्या तीनच दिवसांत या मुलानं एवढा ताव मारला की आपणच कंगाल होऊ या भीतीने अपहरणकर्त्यांने तीनच दिवसांत त्याची स्वत:हून सुटकाही केली!

मुंबईत नाव कमाविण्यासाठी मध्य प्रदेशातून कमलेश चौहान (१९) हा तरुण मुंबईत आला होता. चुनाभट्टी येथे एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून तो कामाला लागला. कमलेशच्या एका पायात व्यंग असल्याने तो लंगडत चालायचा. त्यावरून त्याचे सहकारी त्याला सतत हिणवत असायचे. त्याला वर्षभरापूर्वी कामावरूनही काढून टाकले होते. त्याचे पैसेही मिळत नव्हते. १२ जून रोजी तो पैसे घेण्यासाठी आला, तेव्हा त्याला तेथील व्यवस्थापकाने अपमान करून हाकलून दिले. हताश झालेला कमलेश एका मैदानात जाऊन बसला. तेथे त्याला भूषण सावंत (८) हा मुलगा दिसला. चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे हाच मुलगा आपल्या अपमानाचा बदला घेऊ शकेल, असे त्याला वाटले. या मुलाला खूप खायला घालायचे आणि बलवान बनवायचे, असे त्याने ठरवले. गोड बोलून त्याने या मुलाला आपल्याबरोबर नेले. मुलाला खूप खायला द्यायचे, असे त्याने ठरवले होते खरे. पण मुलगा एवढे खायचा की तीनच दिवसांत कमलेश वैतागला. त्यामुळे त्याने तीनच दिवसांत त्याला चुनाभट्टी येथे आणून सोडून दिले.

दरम्यान, भूषणच्या अपहरणाचा तपास गुन्हे शाखा ६ चे पथक करत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी कमलेश भूषणला रेल्वेस्थानकातून नेत असतानाचे सीसीटीव्ही चित्रीकरण मिळाले. कमलेशने जे कपडे घातले होते, त्यावरून ते एखाद्या सुरक्षा रक्षकाचे असावेत, असा निष्कर्ष काढला. त्या धाग्यावरून त्यांनी सर्वत्र शोध घेतला. त्यावरून कमलेशची ओळख पटली आणि तो इगतपुरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला अटक केली. भूषण हा चौथीत शिकत असून त्याचे वडील रिक्षाचालक आहेत.