शिकाऊ डॉक्टरांना त्रास देत असलेल्या नागपूर येथील प्राध्यापकांविरोधात एका महिन्यात विभागीय चौकशी अहवाल तयार करण्याच्या प्रमुख मागणीसह प्रस्तावित वेतनवाढ, रजा, बॉण्ड या इतर मागण्यांसाठी राज्यभरातील चार हजार शिकाऊ डॉक्टर २ जुलैपासून बेमुदत संप करणार आहेत. वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेतून तोडगा निघाला नसल्याने संपावर जात असल्याचे मार्डने मंगळवारी जाहीर केले. त्यामुळे मुंबईच्या जेजे रुग्णालयासह राज्यातील १४ वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या सरकारी रुग्णालयातील काम विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकांकडून शिकाऊ डॉक्टरच्या झालेल्या मानसिक छळाच्या विरोधात महाराष्ट्र  असोसिएशन ऑफ रेसिडन्ट डॉक्टर्सकडून (मार्ड) सातत्याने आंदोलन होत आहे. यासंदर्भात जूनमध्ये दोन वेळा संपाची हाक देण्यात आली होती. मात्र प्राध्यापकांवर योग्य कारवाईचे आश्वासन वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन दिल्याने हे संप मागे घेण्यात आले. मात्र संबंधित प्राध्यापकाच्या बदलीव्यतिरिक्त इतर कोणतीही हालचाल करण्यात आली नसल्याने मार्डचे डॉक्टर बुधवारी, १ जुलै रोजी काळ्या फिती लावून काम करणार आहेत तर २ जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून बेमुदत संपाची हाक देण्यात आली आहे. २००९ मध्ये राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे मूळ विद्यावेतन दहा हजार करावे, क्षयरोग व प्रसूतीसाठी प्रत्येकी दोन महिन्यांची भरपगारी रजा, कामाचे तास कमी करणे, निवासी डॉक्टरांची राहण्याची स्थिती सुधारणे आदी मागण्याही मार्डने केल्या आहेत.  मागण्या गंभीरपणे घेतल्या गेल्या नसल्याने आम्हाला नाईलाजास्तव सामूहिक रजेवर जावे लागत आहे, असे मार्डचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले.