गौतम बुद्धांच्या अस्थिकलशावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आणि भारिपच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा आरोप असलेले मनसेचे आमदार राम कदम यांच्या विरोधात पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी, अपहरण तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन लोकांना अटक केली असून राम कदम यांना पोलिसांनी फरार घोषित केले आहे.
श्रीलंकेहून गौतम बुद्धांच्या अस्थींचा कलश घरी आणला असून लोकांनी दर्शनाला यावे, असे आवाहन राम कदम यांनी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्याकडे हा कलश कसा आला, अशी विचारणा केली असता कदम समर्थक व भारिपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन भारिपच्या कार्यकर्त्यांना कदम व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली अशी तक्रार आहे. काही कार्यकर्ते रुग्णालयात दाखल असून पोलिसांनी या प्रकरणी ३० जणांवर गुन्हा दाखल केला आहे तर तिघांना अटक करण्यात आली आहे. तर राम कदम फरार झाले असून तसे पार्कसाइट पोलिसांकडून सांगण्यात आले.
‘हे माझ्याविरुद्धचे षड्यंत्र’

गौतम बुद्धांच्या अस्थिकलश आपण आणलेला नाही तर घाटकोपर येथील भंते प्रशिल यांनी आणला असून आपल्या निवासस्थानी हा कलश आलेलाच नाही, असा दावा राम कदम यांनी केला आहे. विक्रोळी येथे हा कलश आला तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही, परंतु आपल्या घराशेजारी बौद्ध विहारात हा कलश आला, तेव्हाच आक्षेप घेण्यात आला. या कलशाची मिरवणूक काढण्याची तयारी सुरू झाली, त्या वेळी भारिपच्या काही कार्यकर्त्यांनी मला या कार्यक्रमात सहभागी होऊ देण्यास विरोध केला, असा खुलासा राम कदम यांनी आपल्या पत्रात केला आहे. मी निवडणुकीच्या कामात असल्यामुळे या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही, असे सूर्यनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही सांगितले. घाटकोपरमधील जनतेला अस्थींचे दर्शन घेता यावे, यासाठी लोकांपर्यंत ही माहिती पोहोचावी,अशी भूमिका स्थानिक बौद्ध जनतेनी माझ्याकडे व्यक्त केल्यामुळे मी त्याची प्रसिद्धी केली. तथापि भारिपच्या काही कार्यकर्त्यांनीच वाद उपस्थित केल्यामुळे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. तेथे हा वाद मिटल्यानंतर दोन्ही गट माझ्या कार्यालयात आले. तेथे पुन्हा वादावादी झाली. या वेळी मी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांनाही बोलावून घेतले व भारिपच्या मुलांना सुखरूप घरी सोडण्यास सांगितले. याचे सीसी टीव्ही फुटेज माझ्याकडे आहे. माझे आभार मानून जी मुले गेली त्यांनीच माझ्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली हे कोणाचे तरी षड्यंत्र आहे, असे कदम यांनी म्हटले आहे.