लाचखोरांविरुद्ध सापळे यशस्वी होण्यात राज्यातील इतर शहरांपेक्षा मुंबईचा क्रमांक सर्वात शेवटचा आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लाचखोरी कमी झालेली नसली तरी लाचखोर सापडण्याच्या संख्येत मात्र कमालीची घट झाल्याचे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवरून आढळून आले आहे. नाशिकमध्ये सर्वाधिक लाचखोर पकडले गेले तर सर्वात कमी लाचखोर मुंबईत आढळले आहेत.
सर्वाधिक लाचखोरांना पकडण्यामध्ये नाशिक (१७०) आघाडीवर असून त्यापाठोपाठ पुणे (१५७), औरंगाबाद (१२९), नागपूर (११३), ठाणे (१०९). नांदेड (१०५) आणि अमरावती (१०१) यांचा क्रमांक लागतो. राज्यात सर्वत्र लाचखोरांविरुद्ध पुढे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असताना मुंबईत मात्र तसे आढळून येत नाही, असे एका अधिकाऱ्याने मान्य केले. लाचखोरांची छायाचित्रे फक्त संकेतस्थळावर मर्यादित न ठेवता, त्यासाठी स्वतंत्र फेसबुक पेज निर्माण करून त्यावर प्रसिद्ध केली जात आहेत. लाचखोरांना किमान सोशल मिडियाची लाज वाटावी आणि लाचखोरी कमी करावी, असा त्यामागचा हेतू असल्याचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी स्पष्ट केले. अधिकाधिक नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहनही दीक्षित यांनी केले आहे. लाचखोरीमध्ये महसूल विभाग आघाडीवर असून त्यापाठोपाठ नगरविकास, गृहविभाग, ग्रामविकास, नगरविकास, शिक्षण, आरोग्य, पाटबंधारे, राज्य उत्पादन शुल्क, प्रादेशिक परिवहन, सार्वजनिक बांधकाम, विक्रीकर, वन आदींचा क्रमांक लागतो. लाचखोर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्यांच्या व्यवसायानुसार वर्गीकरण करणारी यादी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केली असून त्यामध्ये अभियंत्यांपाठोपाठ डॉक्टर आणि शिक्षकांचा क्रमांक लागतो. सर्वाधिक लाचखोरांमध्ये तलाठी आहेत.