आठ महिन्यांपूर्वी झालेल्या मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर विविध त्रास सहन केलेला नासीर खान हा रुग्ण बुधवारी अखेर दगावला. अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्यामुळेच हा मृत्यू ओढवल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला असून, वारंवार संपर्क साधल्यानंतर याबाबत गुरुवारी बाजू मांडू, असे रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले.
मालाड येथे राहणाऱ्या आणि तयार कपडय़ांच्या व्यवसायात नोकरी करणाऱ्या नासीर (३३) याचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची पत्नी आस्मा खान हिने त्याला एक किडनी देण्याचे ठरवले. सुमारे आठ महिन्यांपूर्वी अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. पंधरा दिवसांनी त्याला पोटदुखी, हगवण आणि चक्कर येणे अशा प्रकारचा त्रास होऊ लागला. रुग्णालयात त्याला नेले असता तेथील डॉक्टर्स त्याला औषधे देत राहिले. शस्त्रक्रियेनंतर अडीच-तीन महिन्यांनी नासीरची प्रकृती ढासळू लागली. त्यामुळे त्याला जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जसलोक रुग्णालयात नासीरवर सुमारे १५ ते १८ दिवस उपचार सुरू होते, परंतु प्रकृतीत फारशी सुधारणा होत नव्हती. नंतर त्याच्या तोंडातून आणि मूत्रावाटे रक्त निघू लागले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नासीरचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन करण्यात आले, तेव्हा त्याच्या पोटात सुमारे एक मीटर लांबीची तार असल्याचे दिसले. ही तार बाहेर काढण्यासाठी करावयाच्या शस्त्रक्रियेचा खर्च या गरीब कुटुंबाला झेपण्यासारखा नव्हता, त्यामुळे त्यांनी नासीरला जे.जे. रुग्णालयात हलवले. या ठिकाणी केलेल्या तपासण्यांमध्ये, या तारेमुळे नासीरच्या शरीराच्या अंतर्भागात संसर्ग होऊन क्षयरोग बळावल्याचे निदान झाले. नासीर खानच्या पत्नीने सेव्हन हिल्समधील डॉक्टरांची भेट घेतली, तेव्हा ही तार म्हणजे मूत्रपिंड बसवताना वापरला जाणारा ‘सपोर्टर’ असून, शस्त्रक्रियेनंतर १५-२० दिवसातच तो बाहेर काढायला हवा होता, असे तिला सांगण्यात आले. ‘तुम्ही तो काढायला का सांगितले नाही’, असे डॉक्टरांनीच तिला उलट विचारले.एका आठवडय़ापूर्वी प्रिन्स अली खान रुग्णालयात शस्त्रक्रिया करून ही ‘तार’ बाहेर काढण्यात आली. यानंतरही त्याची प्रकृती खालावत गेल्यामुळे त्याला पुन्हा जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला ताप येणे, जुलाब होणे असे त्रास होतच राहून प्रकृती फारच बिघडली. बुधवारी त्याचा मृत्यू ओढवला. त्याच्या मृत्यूचे कारण क्षयरोग असे सांगण्यात येत असले, तरी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ‘सपोर्टर’ बाहेर काढण्याबद्दल काहीच न सांगता निष्काळजीपणा केल्यामुळे नासीरचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचा भाचा इम्तियाज खान याने केला. या संदर्भात गुरुवारी दुपापर्यंत माहिती घेऊ, असे रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवींद्र करंजीकर यांनी सांगितले.