युती-आघाडी तुटल्याने राजकीय पक्षांमध्ये आयत्या वेळी निर्माण झालेली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची तूट पालिकेतील विद्यमान नगरसेवकांनी भरून काढली खरी, मात्र या विधानसभेत लढलेल्या २३ नगरसेवकांपैकी अवघ्या सहा नगरसेवकांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. त्यातील तीन नगरसेवक भाजपाचे तर दोन शिवसेनेचे आहेत.
निवडणुकीत एकटे लढण्याचा निर्णय घेतलेल्या भाजपाला परिचयाचे चेहरे देणे अवघड जात असताना पालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला साथ दिली आणि भाजपाने सर्वाधिक आठ नगरसेवकांना विधानसभेत जाण्यासाठी उमेदवारीची संधी दिली. भाजपाचे आठपैकी तीन नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपाचे पालिकेतील गटनेते मनोज कोटक मात्र भांडुप पश्चिम मतदारसंघातून पराभूत झाले.
शिवसेनेतील केवळ चारजणांना संधी मिळाली. त्यातील अशोक पाटील व सुनील प्रभू अशा दोघांनीच विजयश्री खेचून आणली. आयत्या वेळी संधी मिळालेल्या युगंधरा साळेकर तसेच बेस्ट समितीचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांना मात्र पुन्हा पालिकेत परतावे लागणार आहे.
दहिसर मतदारसंघातून तीन नगरसेविका तर जोगेश्वरी पूर्व, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम या तीन विभागांमधून प्रत्येकी दोन नगरसेवक रिंगणात उतरले होते. त्यामुळे पाच नगरसेवकांचा पराभव निवडणुकीआधीच निश्चित झाला होता.

विजयी नगरसेवक
भाजपा – मनिषा चौधरी (दहिसर), अमित साटम (अंधेरी पश्चिम), कॅ. आर. तमिल सेल्वन (सायन कोळीवाडा)
शिवसेना –  अशोक पाटील (भांडुप पश्चिम), सुनील प्रभू (िदडोशी)

काही पराभूत नगरसेवक
भाजपा – मनोज कोटक (भांडुप पश्चिम), डॉ. राम बारोट (मालाड पश्चिम), विठ्ठल खरटमोल (अणुशक्ती नगर), कृष्णा पारकर (वांद्रे पूर्व), उज्ज्वला मोडक (जोगेश्वरी पूर्व)
शिवसेना – अरविंद दुधवडकर (मलबार हिल), युगंधरा साळेकर (मुंबादेवी)
काँग्रेस – शीतल म्हात्रे (दहिसर), प्रवीण छेडा (घाटकोपर पूर्व), मनोज जामसूतकर (शिवडी)
राष्ट्रवादी – हरून खान (घाटकोपर पश्चिम), राखी जाधव (घाटकोपर पूर्व)
मनसे –  भालचंद्र आंबुरे (जोगेश्वरी पूर्व), दीपक पवार (मालाड पश्चिम), ईश्वर तायडे (चांदिवली), दिलीप लांडे (घाटकोपर पश्चिम)