अमेरिकेत या आठवडय़ात होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हेसुद्धा उपस्थित राहणार आहेत. विखे-पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी होतील, असे मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केल्याने हा दौरा शासकीय खर्चाने होणार असा अर्थ काढला जातो. एकीकडे भाजपच्या विरोधात काँग्रेस आक्रमक भूमिका घेत असताना विरोधी नेत्याने सरकारी खर्चाने जाणे कितपत योग्य, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत व त्यांनीच आपल्याला बरोबर येण्याची विनंती केली होती. अर्थात, सरकारी खर्चाने जाण्याबाबत आक्षेप असल्यास आपण स्वखर्चाने अमेरिकेत जाऊ, असे विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्याच वेळी विखे-पाटील यांच्या शेजारी बसलेले प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपण मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेत्यांना कधी बरोबर नेले नव्हते, असे सांगत विखे-पाटील यांच्या शासकीय दौऱ्याबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली.