भूमी अधिग्रहण विधेयक, शेतकरी आत्महत्या आणि केंद्र सरकारची शेतकरीविरोधी भूमिका या सर्वांविरोधात कॉंग्रेस पक्ष देशव्यापी आंदोलन उभारणार असून, त्याची सुरुवात ३० एप्रिलपासून अमरावती जिल्ह्यातून होणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी मंगळवारी सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्त्व कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी करणार असून, ते अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावांना भेटी देणार असून, तेथील शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.
राहुल गांधी मंगळवारी संध्याकाळी नागपूरमध्ये येत असून, तेथून ते अमरावतीला रवाना होणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील रांजणा, टोंगलागाव, रामगाव, गुंजी आणि शहापूर या गावांना ते भेट देणार आहेत. गावातील शेतकऱयांशी ते संवाद साधणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
भूमी अधिग्रहण विधेयकाला कॉंग्रेससह इतर विरोधी पक्षांनी विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात या विधेयकाविरोधात जनमत तयार करण्यासाठी आणि शेतकऱयांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कॉंग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे.