राज्यातील सर्वसामान्य माणसाचा कल सध्या महायुतीच्या बाजूने असल्यामुळे ती अभेद्य राहणे गरजेचे असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना थोडं सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. राजू शेट्टी यांनी बुधवारी दुपारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुमारे तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
राजू शेट्टी म्हणाले, महायुतीची केमिस्ट्री चांगली जमलेली आहे. जनतेनेही ती स्वीकारलेली आहे. आज खेड्यापाड्यात कोणालाही विचारले तर त्याचा कल महायुतीच्या बाजूने आहे. अशावेळी ही युती अभेद्य राहणे गरजेचे आहे. सामान्य माणसाची ती गरज असल्याचे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले आणि मतभेद लवकरात लवकर मिटवून निर्णय घेण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा महायुती संदर्भात आपली कोणतीही आडकाठी नसल्याचे सांगितल्याचे राजू शेट्टी म्हणाले. मात्र, भाजपला जास्त जागांची अपेक्षा आहे. त्यानंतर मित्रपक्षांना जागा सोडल्यावर आमच्याकडे कमी जागा उरतात, असे उद्धव ठाकरे यांनी मला सांगितल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
दरम्यान, जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा लवकर सुटेल आणि महायुती अभेद्यच राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जागावाटपात आपल्या पक्षाला १३ जागा हव्या आहेत, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.