कलानगर, शीव आणि अमर महल या तीन ठिकाणची वाहतूक कोंडी सोडवणारा आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला पूर्व द्रुतगती महामार्गाशी जोडणारा सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता मुंबईकरांसाठी शुक्रवारी खुला होत असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने जाहीर केले आहे. या नव्या रस्त्यामुळे पश्चिम ते पूर्व द्रुतगती महामार्ग हे अंतर फक्त २० मिनिटांत कापता येणार आहे. या मार्गाबरोबरच अमर महल येथील उड्डाणपूलही खुला होत आहे. २४ एप्रिल रोजी मुंबईत मतदान असल्याने त्या आधी हा प्रकल्प खुला होत असल्याने मतदारांना भुलवण्यासाठी हा प्रकल्प घाईघाईत खुला केला जात असल्याची चर्चा आहे.
पूर्व द्रुतगती महामार्गावर अमर महल, शीव येथे आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावर कलानगर भागात प्रचंड वाहतूक कोंडी होते. दोन्ही मार्गावरील वाहनांना परस्पर दिशेने जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागतो. सध्या वाहतूक कोंडीत हे अंतर कापण्यासाठी तब्बल एक ते दीड तासांचा अवधी लागतो. त्यासाठी पूर्व द्रुतगती महामार्गावरून शीवपर्यंत जाऊन
तेथून कलानगर जंक्शन गाठून मग पश्चिम द्रुतगती महामार्गाला जावे लागते. हा वळसा कमी करण्यासाठी आणि या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएने सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता बांधला आहे. या रस्त्यामुळे हे अंतर आता फक्त २०-२५ मिनिटांत कापणे शक्य होणार आहे.
हा रस्ता सुरू करतानाच अमर महल जंक्शन आणि सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता यांना जोडणारा
उड्डाणपुलही सुरू केला जाणार आहे. अमर महल जंक्शन हे जंक्शन पूर्व द्रुतगती महामार्गावरी महत्त्वाच्या जंक्शनपैकी एक आहे. येथे पाच ठिकाणांहून रस्ते एकत्र येतात.

* सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याची लांबी ३.५ किमी
* रोज ८० हजार वाहने ये-जा करतील, असा अंदाज
* तब्बल ११ वर्षे काम सुरू असलेला आणि सर्वाधिक रखडलेला प्रकल्प. या रस्त्याचे काम २००३ मध्ये हाती घेण्यात आले होते.
* या रस्त्याचे काम पूर्ण होण्याचे सुमारे १२ मुहूर्त हुकले आहेत.
* मूळ खर्च ११४ कोटी रुपये अपेक्षित होता. तो सुमारे ४३० कोटी रुपयांपर्यंत पोहोचला.
* शहराचा पूर्व आणि पश्चिम भाग जोडणारा महत्त्वाचा दुवा़