कर्करोगग्रस्त रुग्ण, गर्भवती महिला आदींना मुंबईच्या उपनगरी गाडय़ांमध्ये विशेष डब्याची सोय आहे. मात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी एका डब्यात काही आसनेच फक्त राखून ठेवलेली असतात. परंतु गर्दीच्या वेळेत या आसनांपर्यंत पोहोचणेच काय ज्येष्ठांना गाडीत चढणेही शक्य नसते. त्यामुळे ज्येष्ठ  नागरिकांसाठी रेल्वेने विशेष डब्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करणाऱ्या एका पत्राचे रूपांतर न्यायालयाने जनहित याचिकेत करून घेतले. या मुद्दय़ाचे गांभीर्य लक्षात घेऊन अशी व्यवस्था करता येईल का, याविषयी सहा  आठवडय़ांत स्पष्टीकरण द्यावे, असा आदेशही न्यायालयाने रेल्वेला दिला.
ज्येष्ठांना लोकल प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणींबाबत ए. बी. ठक्कर या ज्येष्ठ नागरिकाने उच्च न्यायालयाला पत्र लिहिले असून ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या असलेली सोय पुरेशी नसून अपंग, कर्करोगग्रस्त आणि गर्भवती महिलांप्रमाणे त्यांच्यासाठीही विशेष डब्याची सोय करण्याबाबत निर्देश देण्याची मागणी केली आहे.  
न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर ठक्कर यांच्या पत्रावर सुनावणी झाली. ठक्कर यांनी पत्रांमध्ये उपस्थित केलेले मुद्दे, लोकलच्या जीवघेण्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास आणि त्यानुसार त्यांनी केलेली मागणी ही योग्य असल्याचे न्यायालयाने नमूद करीत न्यायालयाने ठक्कर यांच्या पत्राचे जनहित याचिकेत रूपांतर केले. लोकलच्या सामान्य डब्यामध्ये काही जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. मात्र मुंबईतील उपनगरीय लोकलचा प्रवास हा एक प्रकारचे दिव्य असून ज्येष्ठ नागरिकांना आपल्यासाठी आरक्षित असलेल्या जागेवर जाऊन बसणे दूरच; पण लोकलमध्ये चढणेही अडचणीचे असल्याचे ठक्कर यांनी पत्रात म्हटले आहे. त्यामुळे अपंग, कर्करोगग्रस्त आणि गर्भवती महिलांप्रमाणे ज्येष्ठांसाठीही विशेष डब्याची सोय उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी
केली आहे.
ठक्कर यांच्या पत्राची दखल घेत न्यायालयाने ज्येष्ठांनाही अशी सुविधा उपलब्ध करता येऊ शकते का, याबाबत एक योजना तयार करून त्याबाबत सहा आठवडय़ांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.