अल्पमतातील सरकार बनवणे आणि चालवणे हे घटनाविरोधी असल्याचा टोला लगावत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार का, असा प्रश्न शिवसेनेने विचारला आहे. भाजपचे विधीमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला १२२ जागांवर यश मिळाले. मात्र, अद्याप भाजपकडे स्पष्ट बहुमत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या जुन्या मित्राला टोले लगावत शिवसेनेचा योग्य सन्मान राखण्याचा एकप्रकारे सल्ला दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधील अग्रलेखात गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकही करण्यात आले आहे.
अल्पमतातले सरकार बनवू आणि चालवून दाखवू ही भूमिका सध्या ठीक आहे, पण असे सरकार चालवून सत्तेचा भोग घेणे घटनाविरोधी आहे, असा टोला लगावत या अग्रलेखामध्ये, ‘शरद पवार यांनी फडणवीस सरकारला न मागता पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर फडणवीसांचे सरकार चालवले जाणार आहे काय? महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त व कॉंग्रेसमुक्त करण्याचे वचन देऊन आपण सत्तेवर आला आहात व ज्या विदर्भातून आपण आला आहात त्याच विदर्भात जलसिंचनाचे मोठे घोटाळे राष्ट्रवादीवाल्यांनी करून ठेवले आहेत. त्यामुळे देवेंद्र सरकारच्या पावित्र्याचा प्रश्‍न सुरुवातीपासूनच निर्माण झाला आहे.’ असाही मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.