शिवसेना, भारतीय जनता पक्षातील युती आकड्यांवर टिकलेली नसून, दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बुधवारी सांगितले. दोन्ही पक्ष कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा करीत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
जागावाटपाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमधील संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. पुढील आठवड्यात निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असली, तरी अद्याप या दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून एकमत झालेले नाही. त्याचबरोबर महायुतीतील इतर घटक पक्षांना किती जागा सोडायच्या, यावरूनही मतभेद आहेत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा बुधवारी संध्याकाळी मुंबईमध्ये राज्यातील नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत. दुसरीकडे शिवसेनेनेही बुधवारी राज्यातील सर्व नेत्यांची आणि जिल्हाप्रमुखांची बैठक ‘मातोश्री’वर बोलावली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महायुतीबाबत भूमिका मांडली.
ते म्हणाले, जागावाटपात थोड्याफार गोष्टी पुढे-मागे होत असतात. मात्र, दोन्ही पक्ष त्यावर चर्चा करीत आहेत. चर्चा अजिबात थांबलेली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असे उद्धव ठाकरे यांनी आधीच परखडपणे सांगितले आहे. महायुतील घटक पक्षांना योग्य तो मान दिला जाईल. शिवशक्तीसोबतच भीमशक्तीही आमच्यासोबत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.