मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने ‘एमआयएम’चे नेते आणि खासदार असदुद्दिन ओवेसी यांना खडे बोल सुनावले असून, त्यांनी पाकिस्तानात जाऊन आपल्या मागण्या पूर्ण करून घ्याव्यात, असा रोखठोक सल्लाही दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखामधून ओवेसी आणि त्यांच्या राजकारणावर मंगळवारी खरमरीत टीका करण्यात आली आहे.
मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या ओवेसी यांच्या मागणीमध्ये दर्प आणि पोटदुखी आहे, अशी टीका करून शिवसेनेने म्हटले आहे की, ‘जात व धर्माच्या आधारावर कोणत्याही सवलती किंवा आरक्षणे असू नयेत, तर आर्थिक निकषावर ती असावीत या मताचे आम्ही आहोत. गरीबातल्या गरीब मुसलमानास सवलती मिळाव्यात, पण त्या मुसलमान म्हणून नव्हे तर या देशाचा नागरिक म्हणून. याच भूमिकेचा स्वीकार सगळ्यांनी केला पाहिजे. आरक्षणाचे व व्होट बँकेचे राजकारण संपल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही याचे भान मुसलमान व हिंदू या दोघांनी ठेवले पाहिजे.’
मराठा समाजाला आरक्षण दिले म्हणून मुसलमानांना द्या, असा ओवेसी याचा हट्ट आहे. अशा हट्टापायीच हिंदुस्थानची फाळणी झाल्याचेही अग्रलेखामध्ये लिहिण्यात आले आहे. मुस्लिम समाजात हिंदूद्वेष आणि धर्मांधता पसरविण्याचे काम ओवेसी बंधू करीत असतात, असाही आरोप करण्यात आला आहे.