महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱयाचा ‘रोजा’ मोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर शिवसेनेने टीका करणारे राजकीय नेते आणि माध्यमांवर आगपाखड केली आहे. बंगळुरूमध्ये एका मुस्लिम शिक्षकाने रमजानच्या महिन्यात शाळेत लहान मुलीवर बलात्कार केला. त्यावर कोणताही नेता ब्रसुद्धा काढत नाही आणि चपाती एकाच्या तोंडाशी नेल्याच्या मुद्द्यावरून गदारोळ घालत असल्याची टीका शिवसेनेने केली आहे. पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखामध्ये याप्रकरणी भूमिका मांडण्यात आली आहे.
महाराष्ट्र सदनातील बजबजपुरीविरोधात शिवसेनेने आवाज उठवला. गेल्या महिन्याभरापासून या सदनाची अवस्था गोठ्यापेक्षा वाईट झाली असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्र सदनात पिण्याचे पाणी नाही. स्वच्छता नाही. कॅन्टिनची धड व्यवस्था नाही. रोख पैसे देऊन हा मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे संतापाचा भडका उडणाराच. तसाच तो उडाला आहे. मात्र, या भडक्यास राजकीय व धार्मिक रंग देऊन वणवा पेटविण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मंत्रालयातून होत आहे, असाही आरोप करण्यात आला आहे.