ठाणे-वाशी रेल्वेमार्गावर तुर्भे आणि कोपरखैरणे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी तब्बल दीड तास खोळंबली होती. संध्याकाळी ५.४८ रोजी झालेला हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे ६.४६ वाजता विशेष ब्लॉक देण्यात आला. त्यानंतर ७.३५ वाजता या मार्गावरील सेवा पूर्ववत झाली. या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड हालअपेष्टांना सामोरे जावे लागले.
गेल्या काही वर्षांत ठाणे-वाशी रेल्वेमार्गावरील प्रवासी संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ९ व १० येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. बुधवारी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास तुर्भे आणि कोपरखैरणे या स्थानकांदरम्यान एका वायरचा ओव्हरहेड वायरला धक्का लागल्याने तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक जागच्या जागी थांबली. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास मध्य रेल्वेतर्फे विशेष ब्लॉक घेण्यात आला. हा ब्लॉक संध्याकाळी साडेसातपर्यंत चालला. तोपर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावरील एकूण १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या.
ऐन गर्दीच्या वेळी या मार्गावर झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. प्रवासी ठाणे स्थानकात खोळंबले होते. अनेकांनी गाडय़ा रवाना होत नसल्याचे पाहून ठाण्यातील सिडको येथील ‘एनएमएमटी’च्या बस थांब्यावर धाव घेतली. मात्र याच दरम्यान नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने ठाणे-बेलापूर मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
त्यामुळे या बसगाडय़ाही उशिराने रवाना होत होत्या. परिणामी पाऊस, तांत्रिक बिघाड आणि वाहतूक कोंडी यांनी एकत्रितपणे प्रवाशांना कोंडीत पकडले. अखेर संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास रेल्वेसेवा पूर्ववत झाली.