मुंबईकर आणि सुट्टय़ा हा योग खूप कमी वेळा जुळून येतो. दर आठवडय़ाची एक किंवा दोन दिवसांची सुटी ही घरातली कामे,  मुलांचा अभ्यास यामध्ये निघून जाते; पण वर्षांच्या सुरुवातीलाच प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवार, रविवार आणि सोमवार अशी तीन दिवसांच्या सुटीचा योग जुळून आल्याने शनिवार-रविवार मुंबई आणि मुंबईजवळची पर्यटनस्थळे गजबजू गेली होती.
मुंबईकराने नव्या वर्षांचे कॅलेंडर खुंटीवर अडकवतानाच, त्यात २४, २५ आणि २६ जानेवारीच्या लागून आलेल्या सुट्टय़ांची नोंद करून ठेवली होती. त्यामुळे घराघरांतून त्या दिवसांची आखणी पंधरा दिवस आधीपासून झाली होती. शनिवार ते सोमवार अशी तीन दिवसांची सुट्टी मिळाली, त्यांनी मुंबईलगतच्या अलिबाग, लोणावळा, खंडाळा या पर्यटनस्थळांकडे मोर्चा वळविला होता;
सुट्टय़ांचा जुळून आलेला योग न सोडण्याचा निर्धार मॉल्सनीही केला होता. त्यामुळे त्यांनीही मुंबईकरांना आकर्षित करण्यासाठी नानाविध कल्पना लढविण्यास सुरुवात केली होती. या तीन दिवसांसाठी मॉल्सनी खास सवलती जाहीर केल्या होत्या. कित्येक ब्रॅण्ड्सनी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ‘तिरंग्याची थीम’ असे खास कलेक्शनही आणले होते. त्यामुळे साहजिकच शनिवारपासून लोकांची पावले या मॉल्सकडे वळली होती. विशेष म्हणजे या वेळी फक्त ब्रॅण्ड्सनी नाही, तर मॉल्समधील ‘फुडकोर्ट’मधील दुकाने आणि हॉटेल्समध्येही विविध सवलती सुरू असल्याने खवय्येकर मुंबईकरांची पावले त्या दिशेने वळली होती. या तीन दिवसांच्या सुट्टय़ांचा योग चित्रपट आणि नाटकांच्या बाबतीत तितकासा फायदेशीर ठरला नाही. इतर वेळी शनिवार-रविवारच्या सुट्टय़ांदरम्यान होणारे तिकिटांचे बुकिंग आणि या काळातील बुकिंग हे जवळपास सारखेच असल्याचे चित्र होते.

यांना पसंती..
*एलिफंटा लेणी, कान्हेरी गुंफा, गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, आरे कॉलनी येथे गर्दी
*गेटवे ऑफ इंडियाला शनिवार सकाळपासून एलिफंटा लेणी, अलिबागला जाणाऱ्या बोटी पकडण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती. बोटींच्या फेऱ्यांमध्ये वाढ
*मुंबईजवळचे ‘थीमपार्क्‍स’, ‘अ‍ॅडव्हेंचर पार्क्‍स’ही गजबजले