टाटा मोटर्सच्या चिखलीतील कार विभागात एप्रिल महिन्यात चार दिवसांचे ‘ब्लॉक क्लोजर’ होणार असल्याचे कंपनी व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. कंपनीची परिस्थिती लक्षात घेता कंपनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात आवश्यकतेप्रमाणे वर्षांतील १२ दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’ करण्याचा करार झाला आहे. त्याअंतर्गत या वर्षांतील पहिला चार दिवसांचा ‘ब्लॉक क्लोजर’ जाहीर करण्यात आला आहे.
चार एप्रिल, तसेच १६ ते १८ एप्रिल असे एकूण चार दिवस कार विभाग बंद राहणार असून तेव्हा येथील नियमित काम होणार नाही. पेंट विभाग तसेच वेल्ड शॉपमध्ये दुरूस्तीचे काम होणार आहे. व्यवस्थापनाने २६ मार्चला ही नोटीस लावली आहे. औद्योगिक मंदीमुळे घटलेल्या उत्पादनाचे कारण देत टाटा मोटर्सने कार विभागात यापूर्वी पाच दिवसांचा आठवडा केला होता. मात्र, थोडय़ाच कालावधीत पुन्हा सहा दिवसांचा आठवडा सुरू करण्यात आला. मंदीमुळे वाहन उद्योगाला फटका बसला, त्यामुळे उत्पादन कमी झाल्याने कंपनीने ‘ब्लॉक क्लोजर’चा प्रयोग सुरू केल्याचे सांगण्यात येते. कामगिरीचा मुद्दा पुढे करत अधिकाऱ्यांसाठी ‘सक्तीची निवृत्ती’ही लागू केली होती. अलीकडेच, कामगारांसाठी स्वेच्छा निवृत्तीही जाहीर केली आहे. आता एप्रिल महिन्यात चार दिवस कार विभाग ठेवण्यात येणार आहे. बंद काळात पाणी, वीज, वाहतूक आदींच्या खर्चाची बचत होत असल्याचा युक्तिवाद व्यवस्थापनाकडून करण्यात येतो.