सुशिक्षित मतदारांचे प्राबल्य आणि हक्काची मतपेढी असलेल्या कोथरूडमध्ये भाजपच्या प्रा. मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या विद्यमान आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्यावर ६४ हजार ६६२ मतांचे अधिक्य घेत कमळ फुलविले. भाजप-शिवसेना युतीमध्ये गेली २५ वर्षे मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र, आता युती तुटल्याचा फायदा घेत भाजपने कोथरूडमधून आपला उमेदवार विजयी करण्यामध्ये यश संपादन केले. या निकालामुळे नगरसेविका असलेल्या मेधा कुलकर्णी या आता विधिमंडळामध्ये आमदार म्हणून प्रवेश करणार आहेत.
शिवसेनेचे विद्यमान आमदार, भाजप-राष्ट्रवादी आणि मनसे या तीन पक्षांचे नगरसेवक अशी लढत झाली. भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पारंपरिक मतांच्या भरवश्यावर भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेत अगदी एकतर्फी वाटावा असाच विजय संपादन केला. पूर्वी शहराच्या मध्यवस्तीतील शनिवार-नारायण आणि सदाशिव या पेठांमधील नागरिक झपाटय़ाने विकसित झालेल्या कोथरूडमध्ये यंदा प्रथमच धनुष्यबाण याबरोबरच कमळ हे चिन्ह मतपत्रिकेवर आले. त्यामुळे आपल्या पक्षाचा उमेदवार आणि कमळाचे चिन्ह मतपत्रिकेवर आल्याचा आनंद मतदारांनी मेधा कुलकर्णी यांना विजयी करून व्यक्त केला. कोथरूडमध्ये शिवसेनेचे चार तर भाजपचे दोन नगरसेवक आहेत. सुशिक्षित मतदारांच्या प्राबल्यामुळे कोथरूड हा युतीचा बालेकिल्ला झाला. मात्र, भाजप-शिवसेना युतीमध्ये गेली २५ वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटय़ाला जात होता. शशिकांत सुतार आणि विनायक निम्हण यांनी सलग दोनदा आणि नंतर चंद्रकांत मोकाटे यांच्या माध्यमातून सलग पाच निवडणुकांमध्ये युतीमध्ये कोथरूड मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार विजयी होत होता. युती तुटल्यामुळे येथे ‘संघ’शक्तीच्या जोरावर भाजपने बाजी मारली. भाजपच्या मेधा कुलकर्णी यांना १ लाख ९४१ मते मिळाली. त्यांच्या विरोधात निवडणुकीच्या िरगणात असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेचे आणि काँग्रेस या चार पक्षाच्या उमेदवारांना मिळून ९२ हजार ५६३ मते मिळाली.
 
मेधा कुलकर्णी (भाजप) – १ लाख ९४१
चंद्रकांत मोकाटे (शिवसेना) – ३६ हजार २७९
बाबूराव चांदेरे (राष्ट्रवादी) – २८ हजार १७९
किशोर शिंदे (मनसे) – २१ हजार ३९२
उमेश कंधारे (काँग्रेस) – ६ हजार ७१३
नकाराधिकार (नोटा) – १ हजार ५८३