कलाकुसरीच्या वस्तुविक्रीचा व्यवसाय करण्याबरोबरच अन्य कलाकारांच्या वस्तूंना ऑनलाइन बाजारपेठ मिळवून देणाऱ्या उद्योजिका अक्षया समीर बोरकर या ऑस्ट्रेलियातील ‘ब्रिलियंट बिझी मॉम’ ठरल्या आहेत. ‘बेस्ट वेब प्रेझेन्स’ आणि ‘इनोव्हेटिव्ह मार्केटिंग’ या दोन श्रेणीत त्यांची निवड झाली आहे.
ऑस्ट्रेलिया येथील एक अग्रेसर सोशल ग्रुप व्यावसायिक मातांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून पारितोषिके प्रदान करतो. विशेष अशा व्यवसाय करणाऱ्या १२ वर्गातील यशस्वी असलेल्या ‘बिझनेस मॉम’ची माहिती संकलित केली जाते. प्रत्येक वर्गातील तीन मातांची अंतिम यादी तयार करून प्रत्येक वर्गातील एक ब्रिलियंट मॉम निवडून तिला पारितोषिकाने सन्मानित केले जाते. २०१५ च्या अंतिम यादीमध्ये पुण्याच्या एसएनडीटीची विद्यार्थिनी असलेल्या अक्षया समीर बोरकर यांचा अंतिम यादीमध्ये एकाच वेळी दोन वर्गात समावेश करण्यात आला आहे.
नोकरीमध्ये असलेल्या अक्षया बोरकर यांनी मुलांच्या संगोपनासाठीच्या सुट्टीमध्ये क्राफ्ट कलेची उजळणी केली. त्याद्वारे क्रोशा-शिवणकाम-ग्लासपेंटिंग्ज अशा नानाविध वस्तू तयार करून त्याची छायाचित्रे फेसबुक माध्यमातून प्रसिद्ध केली. यातूनच त्यांच्या व्यवसायाचा प्रारंभ झाला. स्वत:प्रमाणे अन्य कलाकारांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी त्यांनी संकेतस्थळ सुरू केले आणि पाच देशांतून सुमारे ४० कलाकारांना त्यांच्या वस्तूंना ऑनलाइन मार्केटिंग करून नाममात्र सभासदत्व शुल्कामध्ये ऑर्डर्स मिळवून दिल्या. या वैशिष्टय़ाने अक्षया यांचे नाव कलाप्रांतात सर्वाना ठाऊक झाले. त्याची दखल घेत त्यांची ब्रिलियंट बिझी मॉम म्हणून निवड झाली आहे.
घोषित अंतिम यादीतून ९ मे रोजी मेलबोर्न येथे होणाऱ्या कार्यक्रमात १२ ब्रिलियंट बिझी मॉमची निवड केली जाईल. या सर्वाना स्मृतिचिन्ह आणि रोख रकमेची पारितोषिके प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. अक्षया बोरकर यांच्या एकाच वेळी दोन श्रेणीतील निवडीमुळे ऑस्ट्रेलियातील मराठी लोकांमध्ये ‘मराठी पाऊल पडते पुढे’ असे आनंदाचे वातावरण असल्याचे सुहास जोशी यांनी सांगितले.