खोकल्यावरील ‘रेक्सकॉफ’ या औषधाची शहरात संशयास्पद विक्री होत असल्याचे उघड झाले आहे. या औषधात ‘नार्कोटिक’ घटकद्रव्यांचा अंतर्भाव असून ती नशेसाठी वापरली जाण्याची शक्यता असते. या औषधांच्या संशयास्पद विक्रीप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) चिंचवडमधील दोन औषधविक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत.
‘रेक्सकॉफ’ औषधात ‘कोडिन फॉस्फेट’ नावाचा घटक असून हे औषध नशेसाठी वापरले जात असल्याचा एफडीएचा संशय आहे. त्यामुळे ‘कोडिन’ असलेल्या तसेच ज्यांची सवय लागू शकते अशा औषधांच्या खरेदी- विक्रीवर औषध विभागाची नजर आहे. चिंचवडमधील दोन औषधविक्रेत्यांकडून या औषधाची संशयास्पद विक्री होत असल्याची माहिती औषध विभागाला मिळाली होती. या दोन्ही दुकानांवर धाड टाकली असता यापैकी एका विक्रेत्याने ‘रेक्सकॉफ कफ सायरप’च्या ५६०० बाटल्या तर दुसऱ्या औषधविक्रेत्याने ७८० बाटल्यांची विक्री केली होती. या विक्रीच्या नोंदीही संबंधित विक्रेत्यांनी ठेवल्या नव्हत्या. औषध निरीक्षक एस. व्ही. प्रतापवार म्हणाले, ‘‘विक्रीच्यानोंदी न ठेवण्याल्याबाबत या औषधविक्रेत्यांना आधी नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे मांडायची संधी देण्यात आली. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्यामुळे संबंधित विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.’’
‘ खोकल्यावरील ‘कोरेक्स’, ‘रेक्सकॉफ’, ‘फेन्सिडिल’ अशा औषधांमध्ये नशा आणणारे ‘नार्कोटिक’ घटक असतात. मानसिक आजारांवरील उपचारांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या ‘अल्फ्राझोलाम’ आणि ‘रेस्टिल’सारख्या औषधांचाही नशेसाठी वापर होऊ शकतो,’ अशी माहिती औषध विभागाचे सहायक आयुक्त एस. एस. मोहिते यांनी दिली.