महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना थांबण्याचे कोणतेही चिन्ह सध्या दिसत नाही. बुधवारी दुपारपासून गुरुवारी सकाळपर्यंत विविध ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविण्याच्या पाच घटना घडल्या. आतापर्यंत रस्त्याने जाणाऱ्या महिलाच चोरटय़ांचे लक्ष्य होते. मात्र, बाणेर रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटय़ांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेण्याची घटना घडली.
सचिन राजन वंजारी (वय ३६, रा. दुर्गेश बंगला, सकाळनगरशेजारी, औंध) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास बाणेर रस्त्यावर सकाळनगर येथून वंजारी हे स्कूटरवरून घरी निघाले होते. त्या वेळी दोन चोरटे मोटारसायकलवरून आले. त्यानंतर मोटारसायकल स्कूटरला आडवी लावली. ‘तुम्ही गाडी अशी कशाला चालविता’ असे म्हणून या दोघांनी वंजारी यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील ६७ हजार ५०० रुपयांची सुमारे साडेचार तोळ्यांची सोनसाखळी चोरून नेली. दरम्यान, िपपरी, चिंचवड, खडकी, कोरेगाव पार्क या पोलीस ठाण्यांतर्गत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या.
चिंचवड येथे कमल उत्तम सकुंडे (वय ६०) यांच्या गळ्यातील ५२ हजार रुपये किमतीची सोन्याची दोन मंगळसूत्रं, तर गीता वामन कुलकर्णी (वय ६३) यांच्या गळ्यातील ४२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरटय़ांनी पळविले. िपपरीत रेखा मिल्लुमली मोटवाणी (वय ५०) यांच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची सोनसाखळी चोरटय़ांनी हिसकावून नेली. खडकी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ललित नारायण ओव्हाळ (वय ५२) यांच्या गळ्यातील सहा तोळे वजनाचा लक्ष्मीहार चोरटय़ांनी पळवून नेला. गुरुवारी सकाळी कोरेगाव पार्क भागात झालेल्या घटनेत लक्ष्मी रामचंदन अय्यर (वय ६५) यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरटय़ांनी पळवून नेली.