धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह सर्वच भागात पाऊस थांबल्याने पुण्याला पाणी पुरवणाऱ्या धरणांच्या साठय़ाची स्थिती जैसे थे आहे. मात्र, गेल्या वर्षांच्या तुलनेत ही स्थिती उत्तम आहे. कारण या वेळी २५ टक्के पाणी आहे, तर गेल्या वर्षी ६ जुलै रोजी पाच टक्क्य़ांपेक्षाही कमी पाणीसाठा शिल्लक होता.
राज्याच्या सर्वच भागात पावसाचा जोर ओसरला आहे. अगदी मोजक्याच ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. पुण्याला पाणी पुरवणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चारही धरणांच्या क्षेत्रात गेल्या दहा-बारा दिवसांत विशेष पाऊस पडलेला नाही. सोमवारसह गेल्या काही दिवसांत पावसाची एखादी सरही पडलेली नाही. त्यामुळे धरणांच्या साठय़ात वाढ झालेली नाही. पाण्याचा वापर होत असल्याने त्यात किंचितशी घटच झाली आहे. या चार धरणांमध्ये मिळून एकूण उपयुक्त साठा ७.२७ टीएमसी होता. एकूण क्षमतेच्या तुलनेत तो २५ टक्के आहे.
या वेळी अशी स्थिती असली, तरी गेल्या वर्षांच्या तुलनेत ती चांगली आहे. गेल्या वर्षी पावसाने खूपच ओढ दिल्याने नाममात्र म्हणजे केवळ १.४२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्याची टक्केवारी केवळ ४.८४ इतकी होती.
पुढच्या काही दिवसांत पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ होईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
धरणाचे नाव    सोमवारचा पाऊस (मि.मी.)     उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)        टक्केवारी
खडकवासला    ०                    ०.९७                        ४९.४२
पानशेत            ०                    ४.०७                        ३८.२१
वरसगाव         ०                    २.२०                        १७.२०
टेमघर             ०                    ०.०२                        ००.६४
एकूण                                   ७.२७                        २५.००