आपल्या शैलीदार भाषणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला विचार देणाऱ्या वक्तयांची परंपरा पुढे नेण्यासाठी आता पुण्यातील नव्या दमाचे शिलेदार सज्ज झाले आहेत. नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइसच्या सहकार्याने लोकसत्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची पुणे विभागाची अंतिम फेरी बुधवारी (२८ जानेवारी) रंगणार आहे. प्राथमिक फेरीचे आव्हान पार केलेल्या १४ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगणार आहे.
नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइसच्या सहकार्याने लोकसत्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी आयुर्विमा महामंडळ, जनकल्याण बँक आणि तन्वीशता यांचे सहकार्य मिळाले आहे. पुणे विभागाची प्राथमिक फेरी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे चुरशीची झाली होती. या फेरीत ८३ विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. त्यातील १४ स्पर्धक पुणे विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आले. पुण्याबरोबरच सोलापूर, सांगली, कराड, बारामती, दौंड, लोणावळा येथील विद्यार्थीही सहभागी झाले होते. या स्पर्धेचा दुसरा टप्पा आता सुरू होत आहे. पुणे विभागाची अंतिम फेरी बुधवारी (२८ जानेवारी) रंगणार आहे. प्राथमिक फेरीत स्वत:ला सिद्ध केलेल्या १४ वक्तयांमध्ये विभागीय अंतिम फेरीची चुरस रंगणार आहे.
शिवाजीनगर येथील मॉडर्न कला शास्त्र आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या असेंब्ली हॉलमध्ये दुपारी १२ ते सायंकाळी ५ या वेळेत ही फेरी होणार आहे. साहित्य क्षेत्राबरोबरच वक्तृत्वातही आपला ठसा उमटवणारे दिग्गज या फेरीचे परीक्षण करणार आहेत. या फेरीसाठी स्पर्धकांना नव्याने विषय देण्यात आले आहेत. समाजकारण, राजकारण, साहित्य, माध्यमे यांना स्पर्श करणाऱ्या, तरीही रोजच्या जगण्याशी संबंध असलेल्या, विचाराला चालना देणाऱ्या विषयाची मांडणी करण्याच्या आव्हानाला स्पर्धकांना सामोरे जायचे आहे. दिलेल्या पाच विषयांपैकी एका विषयावर किमान ८ मिनिटे आणि कमाल दहा मिनिटे आपले विचार मांडायचे आहेत. विषयाचे सादरीकरण, भाषेचे सौंदर्य आणि समर्पक वापर, आशय, परिणाम, शैली अशा मुद्दय़ांच्या आधारे परीक्षण करण्यात येणार आहे. या वेळी मान्यवर परीक्षकांकडून मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. या फेरीत अव्वल ठरलेले स्पर्धक राज्यस्तरीय महाअंतिम फेरीत दाखल होणार आहेत.