बासरी-व्हायोलिन-तबला कलाकारांची जुगलबंदी.. अवीट गोडीच्या गाण्यांचा फराळ.. फ्युजनवर आधारित कलाकारांचा कथक नृत्याविष्कार.. लाठी-काठी कलेची प्रात्यक्षिके.. अशा विविधरंगी कलाविष्काराने लक्ष्मीपूजनाच्या पहाटे सारसबागेच्या हिरवळीवर गुरुवारी दिवाळी पहाट रंगली. सामाजिक बांधीलकीतून रक्तदानाचा जागर करण्यात आला. वाफाळलेला चहा घेत रसिकांनी आनंद लुटला असला तरी भल्या पहाटे थंडीचा अभाव होता.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे विभागातर्फे आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाचे यंदा १३ वे वर्ष होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ज्येष्ठ कथक नृत्यांगना मनीषा साठे आणि वाद्यवृंद गायक विजय केळकर यांना ‘दिवाळी पहाट’ पुरस्काराने गौरविण्यात आले. महापौर दत्ता धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, माजी नगरसेवक गोपाळ चिंतल, प्रतिष्ठानच्या पुणे विभागाचे अध्यक्ष अजित निंबाळकर, सचिव अंकुश काकडे आणि शांतिलाल सुरतवाला या वेळी उपस्थित होते. आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या सहकार्याने सारसबाग येथे आयोजित शिबिरामध्ये १५२ दात्यांनी रक्तदान केले.
पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेल्या या मैफलीमध्ये बासरीवादक रोहित वनकर, व्हायोलिनवादक तेजस उपाध्ये आणि तबलावादक मििलद उपाध्ये यांची जुगलबंदी रंगली. शांभवी दांडेकर आणि सहकाऱ्यांनी वर्षांऋतुवर आधारित कथक नृत्याविष्कार साकारला. तेजस्विनी साठे यांनी दिग्दर्शित केलेले आणि विक्रम घोष यांच्या संगीतावर आधारित फ्युजन नृत्याविष्कारामध्ये नेहा कर्वे, शर्वरी भिडे, भक्ती झळकी आणि ऐश्वर्या साने यांचा सहभाग होता. दहा वर्षांच्या आर्य काकडे यांने धरलेला ताशाचा ताल आणि सादर केलेल्या लाठी-काठीच्या प्रात्यक्षिकाचा आनंद रसिकांनी लुटला. ‘गीतों का सफर’ कार्यक्रमात जितेंद्र भुरुक, विजय केळकर, माधवी देसाई, धनश्री गणात्रा, सौरभ साळुंके यांनी ‘जागो मोहन प्यारे’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’, ‘मधुबनमें राधिका नाचे रे’, ‘कभी आर कभी पार’, ‘रिमझिम गीरे सावन’, ‘निगाहे मिलानेको जी चाहता है’, ‘ओ नखरेवाली’, ‘एक चतुर नार’, ‘ओ मेरी जोहराजोबी’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ अशी लोकप्रिय गीते सादर केली.