‘कार्यकर्ते कसे मिळवायचे असा आम्हाला प्रश्न नाही..’ असे मानभावीपणे सगळ्या पक्षांकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र आता कार्यकर्ते आणायचे तरी कुठून, असा प्रश्न नेत्यांना सतावतो आहे. त्यातच तुटलेली आघाडी आणि युती यामुळे गेल्या निवडणुकीत जरा तयार झालेल्या कार्यकर्त्यांनाही अजून निवडणूक ‘चढलेली नाही’.
सकाळपासून रात्रीपर्यंत पळापळ करणारे, रात्रंदिवस पक्ष कार्यालयातच पडीक असणारे, पडेल ते काम करण्याचा उत्साह असणारे कार्यकर्ते हीच निवडणुकांची जान! या कार्यकर्त्यांसाठीही निवडणूक म्हणजे उत्सवच! मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र हळूहळू बदलत गेले. गेली काही वर्षे काम करणारे कार्यकर्तेच मिळत नसल्याची तक्रार सगळ्याच पक्षांचे नेते करत आहेत. या निवडणुकीला तर ‘आधीच उल्हास. त्यात फाल्गुन मास’ अशीच पक्षांची परिस्थिती झाली आहे. फुटलेल्या आघाडी आणि युतीमुळे नेत्यांना कार्यकर्ते शोधावे लागत आहेत. त्यातच बंडखोरांनीही भर टाकली आहे. पक्षाचे जे काही थोडेथोडके कार्यकर्ते आता राहिले आहेत, तेही सगळ्या मतदारसंघात आणि बंडखोरांमध्ये विभागले गेले आहेत. त्यातच काहींना अपेक्षित मतदारसंघ मिळालेले नाहीत. त्यामुळेही कार्यकर्ते मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत.
पक्षांचेही हक्काचे कार्यकर्ते असतात, त्या विद्यार्थी संघटनेतील मुले. या निवडणुकीत सगळ्या पक्षांनी स्वतंत्र लढायचा निर्णय घेतला आणि सगळ्यात पंचाईत झाली ती अगदी मुळात काम करणाऱ्या या विद्यार्थी कार्यकर्त्यांची! यापूर्वीच्या काही निवडणुकांसाठी पक्ष विसरून एकत्र काम केल्यानंतर आता एकाच कुठल्या तरी पक्षाचा झेंडा हाती धरणे कार्यकर्त्यांनाही कठीण जात आहे. त्यामुळे अनेकांनी तर निवडणुकीपासून थोडं लांब राहण्याचाही निर्णय घेतला आहे. याबाबत एका कार्यकर्त्यांने सांगितले, ‘लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही सगळे मित्र युतीचा प्रचार केला होता. अगदी महाविद्यालय, परीक्षा सांभाळून कामेही केली. मात्र, आता ज्या मतदारसंघात मी राहतो. तिथे दोन्हीही पक्षाचे उमेदवार उभे आहेत. एक उमेदवार माहिती आहे, तर बाजू दुसऱ्या पक्षाची पटते आहे. या गोंधळात पडण्यापेक्षा प्रचारापासून लांब राहणेच योग्य वाटते आहे.’ युतीच्या या कार्यकर्त्यांसारखीच काहीशी भावना आघाडीतील काही कार्यकर्त्यांचीही आहे. याबाबत एका कार्यकर्त्यांने सांगितले, ‘मी एका पक्षाच्या विद्यार्थी संघटनेत होतो. मात्र, या आधीच्या निवडणुकीला किंवा एरवीही कार्यक्रमांच्या वेळी आम्ही आघाडीतल्या दुसऱ्या पक्षाच्या नेत्यासाठी काम करत होतो. मात्र, आता हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे गोंधळ आहे. सगळेच मित्र आहेत.’