आपल्याकडे केवळ पारतंत्र्याचाच इतिहास सांगितला जातो. मात्र, पारतंत्र्यापूर्वीच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले जाते. हा इतिहास सांगितलाच जात नाही, असे मत प्रसिद्ध लेखक राजेंद्र खेर यांनी व्यक्त केले.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे प्रमोद ओक यांच्या ‘पेशवे घराण्याचा इतिहास’ या द्विखंडात्मक ग्रंथाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन राजेंद्र खेर यांच्या हस्ते झाले. इतिहास अभ्यासक प्र. के. घाणेकर आणि प्रकाशनच्या अमृता कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या.
पेशव्यांच्या इतिहासातून अस्मिता आणि विजिगीषू वृत्ती घेण्याची गरज असल्याचे सांगून राजेंद्र खेर म्हणाले, पेशवाईतील प्रत्येक पराक्रमी पुरुषावर ग्रंथ लिहिले जावेत. जगभरात नेपोलियनवर ५५ हजार तर, हिटलर या व्यक्तिरेखेवर सव्वा लाख पुस्तके उपलब्ध आहेत. मात्र, त्या तुलनेत छत्रपती शिवाजीमहाराज आणि पेशवाईवर तुलनेने कमी लेखन झाले आहे.
या ग्रंथातून पेशवाईचा इतिहास अधिक सखोलपणे मांडला गेला असल्याचे सांगून घाणेकर यांनी पेशवाईतील घटनांविषयीची माहिती आपल्या मनोगतातून दिली. प्रमोद ओक म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये केवळ शिवकालाचाच विचार केला जातो. पेशवाईचा कालखंड अभ्यासाविना उपेक्षित राहिला. पेशवाईतील बऱ्या-वाईट गोष्टी बाजूला ठेवून त्याकडे इतिहास म्हणून तटस्थपणे पाहण्याची गरज आहे. खरा इतिहास समजून घेण्यासाठी अस्सल कागदपत्रे आणि पुस्तके वाचली पाहिजेत.