‘उरतली नभातून खाली माळ ही नक्षत्रांची, लखलखीत तेज:पुंज स्त्रीरत्ने महाराष्ट्राची’ हे बोल असलेले देवकी पंडित यांच्या मधूर आवाजातील कन्यागीत.. ‘माझी मराठी मराठी तिचे कोतुक कौतुक, जगी सर्वत्र बघाया माझे मन हो उत्सुक’ असे बोल असलेल्या मराठी अभिमानगीतासह कन्याकोश आता दृक-श्राव्य स्वरूपातून रसिकांच्या भेटीस येत आहे.
‘चूल आणि मूल’ यातून बाहेर पडत स्त्रीत्वाचे आव्हान पेलून यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करणाऱ्या तेजस्वी महाराष्ट्रकन्यांचा परिचय करून देणारा कन्याकोश आता दृक-श्राव्य स्वरूपात भेटीस येत आहे. विश्वकोश निर्मिती मंडळाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला कन्याकोश हा कन्यागीत आणि मराठी अभिमान गीतासह प्रकटणार आहे. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटविणाऱ्या पावणेतीनशे महिलांच्या यशाचा प्रवास असलेला कन्याकोश विश्वकोश निर्मिती मंडळाने साकारला आहे. केवळ श्राव्य माध्यमातच असलेल्या या कोशाला आता दृक-श्राव्य माध्यमाचे स्वरूप लाभले आहे. या महाराष्ट्रकन्यांची यशोगाथा काव्यमय शब्दांतून उलगडणाऱ्या या कोशाला कन्यागीताचे कोंदण लाभले आहे. गौरी कुलकर्णी हिने लिहिलेल्या या कन्यागीताला नीलेश मोहरीर यांचे संगीत लाभले आहे. देवकी पंडित यांच्या स्वरातील हे गीत ऐकताना या गीतावर आश्लेषा देवळीकर हिच्या नृत्याची जोड मिळाली आहे. कन्याकोशामध्ये अंतर्भूत असलेल्या निवडक १९ महिलांच्या प्रतिमा या गीतामध्ये वापरण्यात आल्या आहेत, अशी माहिती विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ. विजया वाड यांनी दिली. या कन्यागीताबरोबरच मराठी अभिमान गीताची रचना खुद्द विजया वाड यांचीच असून या गीताला नेहा राजपाल हिचा स्वर लाभला आहे.
कन्याकोश हा केवळ कोशामध्येच न राहता शालेय मुलींपर्यंत पोहोचावा आणि या यशस्वी स्त्रियांच्या कर्तृत्वातून शाळकरी मुलींना प्रेरणा मिळावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. ग्रामीण भागातील मुलींना या आदिशक्तींची ओळख २२ तासांच्या ध्वनिचित्रफितीद्वारे करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे, असेही डॉ. विजया वाड यांनी सांगितले.