महिलांच्या सुरक्षिततेसाठी शहरात आता महिला पोलीस अॅक्टीव्हावरून गस्त 30marshal1घालणार आहेत. महिलांची गर्दी असलेल्या ठिकाणांवर या महिला पोलीस मार्शलचे विशेष लक्ष राहणार आहे. एका परिमंडळास चार ते पाच अॅक्टीव्हा देण्यात आल्या आहे. त्यावरून महिला पोलीस कर्मचारी आता गस्त घालणार आहेत.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात महिला बीटमार्शला अॅक्टीव्हा देण्याचा कार्यक्रम मंगळवारी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहरातील महिला पोलिसांसाठी सध्या आठरा अॅक्टीव्हा घेण्यात आल्या आहेत. महाविद्यालय परिसर, शाळा, महिलांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी महिला बीटमार्शल गस्त घालणार आहेत. महिलांच्या विरोधातील गुन्हे रोखण्यासाठी महिला बीट मार्शल सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत पाठक म्हणाले की, प्रत्येक परिमंडळास चार ते पाच अॅक्टीव्हा देण्यात आल्या आहेत. त्या अॅक्टीव्हावरून महिला पोलीस शहरात गस्त घालणार आहेत. शहरात महिलांची गर्दी असलेली काही ठिकाणी पोलिसांनी निश्चीत केली आहेत. त्या ठिकाणी महिला बीटमार्शल विशेष लक्ष ठेवणार आहेत. एका दुचाकीवर दोन बीटमार्शल राहणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

गाडय़ा जाळण्याचा प्रकार नियोजनपूर्वक
सिंहगड रस्त्यावरील सोसायटय़ांमधील गाडय़ा जाळण्याचा प्रकार एखाद्या माथेफिरूने केला नसून तो नियोजनपूर्वक करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. पण, त्यातून काहीच निष्पन्न झालेले नाही. एका खुनाच्या गुन्ह्य़ातील आरोपीकडे चौकशी केली आहे. मात्र, चौकशीत आतापर्यंत त्याचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांना सीसीटीव्ही चित्रीकरणात गाडय़ा जाळणाऱ्या व्यक्तीचे चित्रीकरण मिळाले आहे. त्यावरूनच त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. त्या रेखाचित्रावरून शहर व गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके तपास करीत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी दिली.