मराठी भाषेच्या प्रेमासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुण्याने आता मातृभाषेतील शिक्षणाकडे मात्र पाठ फिरवल्याचे दिसत आहे. पुढील शैक्षणिक वर्षांसाठी आलेल्या स्वयंअर्थसाहाय्यित शाळांच्या प्रस्तावांत पुणे जिल्ह्य़ातून मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी एकही प्रस्ताव आलेला नाही.
मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी कमी होणारा प्रतिसाद, प्रामुख्याने मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडून कोणतीही योजना किंवा धोरण नसणे, या बाबींचा परिणाम म्हणून आता मराठी माध्यमाच्या नव्या शाळा सुरू होण्याची प्रक्रियाच थांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्य़ातून पुढील शैक्षणिक वर्षांत मराठी माध्यमातून शाळा सुरू करण्यासाठी एकही प्रस्ताव आलेला नाही.
राज्यात २०१५-१६ साठी शिक्षणसंस्थांकडून स्वयंअर्थसाहाय्यित शाळा सुरू करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले. शाळेचा दर्जा बदलण्यासाठीही प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यात मराठी माध्यमाच्या शाळांनी दर्जा वाढवण्यासाठी प्रस्ताव दिले आहेत. मात्र, त्यांची संख्याही तुलनेने कमीच आहे. पुणे जिल्ह्य़ातून नव्या शाळा सुरू करण्यासाठी आणि शाळेचा दर्जा बदलण्यासाठी एकूण २४७ प्रस्ताव आले आहेत. त्यात एकही मराठी माध्यमाची शाळा नाही. इंग्रजी माध्यमातून शाळा सुरू करण्यासाठी सर्व प्रस्ताव आले आहेत. शाळेचा दर्जा बदलण्यासाठी म्हणजे प्राथमिकची उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक शाळा करण्यासाठी एकूण २० प्रस्ताव आले आहेत. त्यातही बहुतेक प्रस्ताव हे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आहेत. आलेल्या प्रस्तावांपैकी ८४ शाळा पात्र ठरल्या आहेत. १६१ शाळा आवश्यक ते निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
‘तीन वर्षांपासून प्रतिसाद नाही’
‘गेल्या तीन वर्षांपासून मराठी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रतिसाद दिसत नाही. यावर्षी इतर जिल्ह्य़ांतूनही मराठी माध्यमाच्या नव्या शाळा सुरू करण्यासाठी ८ ते १० प्रस्ताव आला आहे. मात्र, त्यातही पात्रतेचे निकष पूर्ण करणारे प्रस्ताव दिसत नाहीत,’ असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.