राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरीत सुरू करण्यात आलेली सदस्यनोंदणी ‘रडतखडत’ सुरू आहे. वारंवार स्मरण देऊनही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून नोंदणी पुस्तके पक्षकार्यालयात जमा होत नसतानाच प्रदेशाकडून सातत्याने विचारणा होत आहे. अशात, शहराध्यक्ष योगेश बहल बाहेरगावी गेले असताना पक्षाचे नेते आझम पानसरे यांनी पक्षकार्यालयात येऊन नोंदणीच्या कामाचा आढावा घेतल्याने अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहर राष्ट्रवादीने ७५ हजार सदस्यनोंदणीचा संकल्प केला, त्यासाठी आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना नोंदणीची पुस्तके देण्यात आली. निर्धारित व त्यानंतरची वाढीव मुदत संपल्यानंतरही अनेकांनी पुस्तके जमा केलेली नाहीत. पक्षकार्यालयातून सातत्याने पाठपुरावा करूनही अनेकांकडून प्रतिसाद मिळत नाही. प्रदेशाने ही पुस्तके जमा करण्यास सांगितले. मात्र, ते काम रखडले. त्यामुळे पानसरेंनी पक्षकार्यालयात येऊन आढावा घेतला. या बैठकीत नगरसेवक जगदीश शेट्टी, जितेंद्र ननावरे, फजल शेख, रामदास मोरे आदी उपस्थित होते. शहराध्यक्ष बहल बाहेरगावी असल्याने गैरहजर होते. लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दारूण पराभवानंतर बहलांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तथापि, अजितदादांनी तो मंजूर केला नाही. पानसरे गटाला पक्षाची सूत्रे हाती घ्यायची आहेत. शेट्टी हे अध्यक्षपदासाठी तीव्र इच्छुक आहेत. नोंदणीच्या निमित्ताने पानसरे व शेट्टी यांनी पक्षाच्या कामकाजात लक्ष घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.