पुणे शहरातील वाहतूक आणि वाहनांची संख्या लक्षात घेता येथील संपूर्ण सार्वजनिक वाहतूक सरसकट इथेनॉलवर चालवा, अशी सूचना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी केली. हा निर्णय घेताना येथील महापालिकेत विरोधकांची सत्ता असली, तरी या प्रकल्पाला मंजुरी देण्याचे काम केंद्र शासनाचे आहे. त्यामुळे या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
परमहंस स्वच्छंदानंद सेवा प्रतिष्ठानच्या वतीने ऊर्जा आणि पाणी या क्षेत्रात गेली काही वर्षे काम करत असलेले संतोष गोंधळेकर यांचा सत्कार शनिवारी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सत्कार समितीचे अध्यक्ष जितेंद्रनाथ महाराज कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार अनिल शिरोळे, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधुरी मिसाळ, सत्कार समितीच्या कार्याध्यक्ष, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, राजस साठे, किरण पटवर्धन यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
इथेनॉलची निर्मिती पश्चिम महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात होते. मात्र त्याचा वापर होत नाही. त्याचा फटका सर्वसामान्य शेतकरी तसेच साखर कारखान्यांना बसत आहे. इथेनॉल हा इंधनाचा उत्तम पर्याय आहे. पुण्यातील वाहतूक प्रश्नांचा विचार करता येथील वाहने इथेनॉलवर चालवणे आवश्यक आहे. त्याची सुरुवात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपासून करण्याची गरज आहे. मात्र, केवळ काही गाडय़ा इथेनॉलवर चालवण्याऐवजी सरसकट सर्व गाडय़ा इथेनॉलवर चालवल्या पाहिजेत. हे करताना येथे विरोधकांची सत्ता असली, तरी केंद्र व राज्यात युतीची सत्ता असल्यामुळे या प्रकल्पाला मदत करण्याची आमची तयारी आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
पर्यावरणतज्ज्ञ संतोष गोंधळेकर यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून प्रायोगिक तत्त्वावर इंधनाची निर्मिती सुरू केली आहे. रोज २५ टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून ५०० लिटर इंधनाची निर्मिती करण्यात येत आहे. या इंधनावर पीएमपीच्या दहा गाडय़ा धावू शकतील. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून स्वयंपाकासाठीचे इंधन तयार करण्याचाही गोंधळेकर यांचा प्रयोग यशस्वी झाला असून या इंधनाचाही वापर शहरात सुरू झाला आहे.