अमेरिका आणि युरोपने आपल्याला लुटून स्वत:ची प्रगती साधली. न्यूनगंड ही आपल्याला भेट दिली आहे. या प्रगतीला कारणीभूत असलेल्या कार्यप्रवण वृत्तीचा आपल्यामध्ये अभाव आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण आभासी जगामध्ये जगतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांनी शनिवारी व्यक्त केले. फेसबुकवर हजार मित्र असतील, पण प्रत्यक्ष जीवनामध्ये दोन मित्रदेखील नसतात या वास्तवावर त्यांनी बोट ठेवले.
अक्षर प्रकाशनतर्फे नीलिमा पोतनीस यांच्या ‘मी अनुभवलेली अमेरिका’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. प्रकाशिका मीना कर्णिक आणि नूतन आजगावकर या वेळी उपस्थित होत्या.
एका शिष्यवृत्तीच्या निमित्ताने मी चार महिने अमेरिकेत वास्तव्य केले. तेव्हा तेथील लेखकांशी चर्चा करायला मिळाली होती. अमेरिकेचे वेगळे दर्शन घडले, असे सांगून डॉ. अनिल अवचट म्हणाले, सोपविलेले काम केले पाहिजे ही अमेरिकेतील लोकांची वृत्ती आहे. त्यामुळे तेथे कार्यप्रवण संस्कृती आहे. आपल्याकडे काम चुकविण्यातच फुशारकी मानली जाते. भारतीय लोक अमेरिकेमध्ये गेल्यावर शिस्तीमध्ये वागतात. रस्ता हे थुंकण्यासाठी बेसिन आहे असाच आपला समज आहे. अमेरिकेच्या लोकांकडून काही शिकण्याची आवश्यकता आहे. या गोष्टी करण्यासाठी काही पैसे लागत नाहीत. तंत्रज्ञानाच्या मागे लागून आपण परंपरागत ज्ञानाचा ठेवा गमावत चाललो आहोत. माझा तंत्रज्ञानाला विरोध नाही, तर तंत्रज्ञान ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्या स्वार्थी लोकांना विरोध आहे. लेखक ही वेगळी जमात नाही, तर तेही चारचौघांसारखी माणसेच असतात. त्यामुळे प्रत्येकाने लेखणी हाती घेऊन आपले अनुभव लिहिले तरच या प्रकाशनाची फलश्रुती आहे.
या वेळी नीलिमा पोतनीस यांनी मनोगत व्यक्त केले. मीना कर्णिक यांनी प्रास्ताविक केले. प्रभा जोशी यांनी सूत्रसंचालन केले.