कोणत्याही कलेसंदर्भात वारसा, परंपरा आणि सिद्धी या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मात्र, नवनिर्मिती करताना अनेकदा या गोष्टींचा विचार होत नाही. हा विचार वाढण्याची आवश्यकता आहे. नवनिर्मितीमध्ये औचित्य आणि सौंदर्यभक्तीचा निकष महत्त्वाचा असतो, असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केले.
तेजल प्रकाशनतर्फे प्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर यांच्या ‘रागचित्र’ या स्वरचित बंदिशींच्या संग्रहाचे आणि सीडीचे प्रकाशन रवी परांजपे यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ संवादिनीवादक डॉ. अरिवद थत्ते, प्रसिद्ध गायिका आरती ठाकूर-कुंडलकर, ‘मिडास’चे पराग शहा आणि प्रकाशिका ललिता मराठे या वेळी उपस्थित होत्या.
रवी परांजपे म्हणाले,‘‘ भारताला पाच हजार वर्षांची परंपरा आहे. आपली परंपरा मोठी आहे. मात्र, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडातील माणसे कमी पडली. आपल्याकडे असलेले मौल्यवान पुन्हा अभ्यासून मांडण्याची आवश्यकता आहे. मात्र, स्वत्व आणि सत्त्व राखून जागतिकीकरणाच्या लाटेवर कोण स्वार होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गुरुचे समाधान करणे हे प्रत्येक शिष्याचे कर्तव्य असते. मात्र, गुरुच्या कोशातून बाहेर आल्याशिवाय शिष्याने सादरीकरण करू नये. ही पातळी पूर्वीच ओलांडलेल्या सुयोग कुंडलकर यांचे ‘रागचित्र’ हे नवनिर्मितीच्या प्रक्रियेतील पुस्तक आहे.
परंपरेचा आदर आणि भान ठेवून सुयोग कुंडलकर हे सांगीतिक वाटचाल करीत असल्याचे डॉ. अरिवद थत्ते यांनी सांगितले. सुयोग कुंडलकर यांनी आपल्या मनोगतातून या लेखनामागची प्रक्रिया उलगडली. उत्तरार्धात आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनाची मैफल झाली. त्यांना सुयोग कुंडलकर यांनी संवादिनीची आणि संजय देशपांडे यांनी तबल्याची साथसंगत केली. ललिता मराठे यांनी आभार मानले. अर्चना गोगटे यांनी सूत्रसंचालन केले.