पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होणाऱ्या अपघातांचा अभ्यास वाहतूक शाखेने केल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे २५ ते ३५ हा कमवता वयोगटातील सर्वाधिक तरुण अपघातात मृत्युमुखी पडत आहेत. वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वाहने चालविल्यामुळे दुचाकीस्वार मृत्यू पडणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. शहरात सर्वाधिक अपघात हे सायंकाळी सहा ते मध्यरात्री एक या वेळात झालेले दिसून येत आहेत. तसेच, आठवडय़ाच्या अखेरीच्या काळात म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी अपघात होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात २०१४ अखेर ४१ लाख चार हजार वाहने आहेत. त्यापैकी पुणे शहरात २८ लाख ६२ तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२ लाख ६८ हजार वाहने आहेत. या एकूण वाहनांपैकी ३० लाख ८० हजार मोटारसायकलची संख्या आहे. त्यामुळे शहरात अपघातामध्ये दुचाकीचे सर्वाधिक अपघात असून दुचाकीस्वारांचाच सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. या वर्षभरात १४५३ अपघात झाले असून त्यामध्ये ३९९ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षी देखील एवढय़ाच व्यक्तींचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. शहरातील वाहतूक सुरळीत चालावी, अपघात व त्यामध्ये मृत्यूची संख्या कमी होण्यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी शहरात होणाऱ्या अपघाताची माहिती काढली. त्या वेळी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात झालेल्या एकूण अपघातांमध्ये मृत्यू झालेल्यांपैकी व्यक्ती या २५ ते ३५ वयोगटातील आहेत. या वयोगटातील ९५ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नेमका हाच वयोगट हा कमवता वयोगट मानला जातो. त्यामुळे वर्षांला शंभर व्यक्ती कमवायच्या वयात मृत्यू पावत आहेत. त्याबरोबरच मोटारसायकलचे जास्त अपघात झाल्याचे दिसून येत आहे. तसेच, शहरात सायंकाळी सहा ते मध्यरात्री एक या वेळेतमध्ये तब्बल १५६ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
शहरातील अपघाताच्या बाबतीत दुसरी गोष्ट म्हणजे शुक्रवार, शनिवार, आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी लोक कामासाठी, कार्यक्रमासाठी कुटुंबीयांसोबत बाहेर पडतात. त्यामुळे रहदारीचे प्रमाण इतर दिवसांपेक्षा जास्त होऊन सुट्टीच्या दिवशी अपघात जास्त होतात. गेल्या वर्षांत झालेल्या एकूण अपघातापैकी शुक्रवारी ६२, शनिवारी ६१ आणि रविवारी ६० नागरिकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. दारू पिऊन वाहन चालवीत असल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसून आली आहे. तसेच, सुट्टीच्या दिवशी वाहतूक जास्त असल्यामुळे अपघात जास्त होतात. तसेच, पावसाळ्यामध्ये निसरडय़ा रस्त्यांमुळे, वाहतूक कोंडीमुळे अपघातात वाढ झाली आहे. पुणे-बेंगलोर बाह्य़वळण महामार्गावर रहदारीचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रस्त्यावर सर्वाधिक अपघात होत असून याबाबत काय उपाययोजना कराव्यात, याचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांच्याकडून केला जात आहे.
हेल्मेट न घातल्यामुळे २१३ जणांचा मृत्यू
शहरात मोटार सायकल अपघातातील २१४ जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. त्यामध्ये २१३ जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते. शहरात अपघातात मृत्यू होणारे २५ ते ३४ वयोगटातील असले तरी अपघात करणारे देखील याच वयोगटातील असल्याचे दिसून आले आहे. त्याबरोबरच मार्च आणि सप्टेंबर महिन्यात अपघातामध्ये सर्वाधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.