वातावरण चांगले होते आणि आम्ही संघटनेची बांधणीही मजबूत पद्धतीने केली होती, त्यामुळेच शहरात आठही जागांवर यश मिळवता आले, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष, खासदार अनिल शिरोळे यांनी रविवारी व्यक्त केली. तर, अनुकूलता असूनही मतदारांपर्यंत पोहोचण्यात आम्ही कमी पडलो, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक निकालानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया पुढील शब्दात व्यक्त केली.
खासदार अनिल शिरोळे (शहराध्यक्ष, भाजप)-
निवडणुकीचा निकाल कसा लागेल हे ज्या ज्या वेळी मला विचारले जात होते, त्या वेळी मी शहरातील आठही जागा भाजप जिंकणार हे सांगत होतो. लोकांमध्ये गेल्यानंतर ज्या प्रतिक्रिया येत होत्या, लोक जी चर्चा करत होते ती ऐकल्यानंतर चांगल्या यशाचा विश्वास वाटत होता. पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले, शिवाय लोकही आमच्या बरोबर होते. अर्थात वातावरण चांगले असले, तरी संघटना मजबूत असावी लागते. तशी संघटना आम्ही बांधली होती तिचाही फायदा झाला. निवडणूक काळात बूथ यंत्रणा सक्षम केल्यामुळे आणि प्रचारकाळात केलेल्या घर चलो अभियानामुळे हे यश मिळाले.

श्रीकांत पाटील (कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस)-
पुणेकर मतदारांनी दिलेला कौल मान्य करून जे निकाल आले आहेत त्याबाबत आम्ही निश्चितच सखोल विचार करू. पक्षाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे आणि तेही आम्ही करणार आहोत. निवडणूक तयारीला वेळ कमी पडला. त्यामुळेही आमचे नुकसान झाले. आम्ही कुठे कमी पडलो याचा एकत्रित विचार करून पक्षाचे पुढील धोरण सर्वजण मिळून ठरवू.

संजय बालगुडे (प्रभारी शहराध्यक्ष, काँग्रेस)-
राज्यात पंधरा वर्षे आमचे सरकार होते. सातत्याने आघाडी सत्तेत राहिल्यामुळे काही प्रस्थापितांच्या विरोधात मानस तयार झाले होते, त्याचा फटका आम्हाला बसला. त्या बरोबरच राष्ट्रवादीबरोबर असलेली आघाडी तुटल्यानंतर मतदान करताना मतदारांनी निवडून येण्याची क्षमता बघितली.

श्याम देशपांडे (शिवसेना शहरप्रमुख)
पुणे शहरामध्ये शिवसेनेने केलेले काम आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद ध्यानात घेता किमान चार ते पाच जागांवर विजय संपादन करता येईल, अशी आमची अपेक्षा होती. प्रस्थापित सरकारच्या विरोधात जनतेमध्ये असंतोष असताना शिवसेना आणि भाजप हे दोनच पर्याय होते. मात्र, पक्ष म्हणून आमच्याकडे मर्यादित साधने होती. त्याचप्रमाणे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीचा कालावधी कमी पडला. तरीदेखील जनतेला दोष देता येणार नाही. यशापर्यंत पोहोचण्यामध्ये आम्ही कमी पडलो असेच निकालानंतर स्पष्ट झाले आहे.