अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत काहीच धंदा न झाल्यामुळे आता प्रवेश प्रक्रियेचे नियमच संघटनांना ‘जाचक’ वाटू लागलेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील जाचक अटी दूर करण्याची मागणी संघटनांकडून केली जात आहे. आपला धंदा करू पाहणाऱ्या विविध राजकीय, सामाजिक आणि विद्यार्थी संघटना सध्या पालकांमध्ये कमी प्रमाणात असलेल्या जागरूकतेचा फायदा उठवण्याच्या मागे आहेत. चौथ्या प्रवेश फेरीतून प्रवेश घेण्याचा शेवटचाच दिवस राहिल्यामुळे संघटना हातघाईवर आल्या आहेत.
अकरावीची चौथी प्रवेश फेरी ऑफलाईन पद्धतीने झाली. प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाईन प्रवेश फे ऱ्यांमध्ये प्रवेशाची दलाली करण्यासाठी फारसा वाव न मिळालेल्या संघटनांनी अजूनही आशा सोडलेली नाही. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत गेल्यावर्षी झालेल्या गोंधळानंतर शिक्षण विभागाने यावर्षी जरा पहिल्यापासूनच कडक धोरण अवलंबले. नियमांवर बोट ठेवून चालणारा शिक्षण विभाग आणि विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश मिळावा यासाठी हटून बसलेले, जागरूक नसलेले पालक याचा फायदा उठवण्याच्या प्रयत्नात संघटना आहेत. विद्यार्थ्यांकडे मूळ कागदपत्रे असल्याशिवाय त्यांना चौथ्या फेरीत प्रवेश मिळणार नाही. महाविद्यालयात जेवढय़ा रिक्त जागा असतील, तेवढय़ा जागांवरच प्रवेश देण्यात येतील अशा नियमांबाबत पालक जागरूक नाहीत. अशातच एखाद्या कार्यकर्त्यांने ‘ओळख आहे. करू का काम? संस्थावाले अमूक रक्कम मागतात.’ असे सांगितले की पालकही त्या मखलाशीला बळी पडत आहेत.
त्यामुळे पांढरा झब्बा, गळ्यात सोन्याच्या चेन. अशा अवतारातील घोळके महाविद्यालयांमध्ये दिसत आहेत. चौथ्या फेरीच्या प्रवेश यादीत ‘बघा जरा जमतय का.’ अशा विनंत्या प्राचार्याकडे केल्या जात आहेत. प्राचार्यानी नियमाबाहेर प्रवेश करू नयेत, अशा सूचना शिक्षण विभागाने महाविद्यालयांना दिल्या आहेत. ‘प्रवेश क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवेश करण्यात येऊ नयेत. चौथ्या प्रवेश फेरीत गुणवत्तेनुसारच प्रवेश देण्यात यावेत,’ यांसारखे नियम आता संघटनांना जाचक वाटू लागले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसाठी ठेवण्यात आलेले जाचक नियम शिक्षण विभागाने मागे घ्यावेत, अशी मागणी संघटना करत आहेत, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत अडचणी असल्यास विभागीय उपसंचालक कार्यालयाशी मंगळवारी आणि बुधवारी संपर्क साधण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले होते. या दोन दिवसांमध्ये साधारण ३०० विद्यार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधला. त्यापैकी ३ विद्यार्थी हे पुनर्मूल्यांकनात गुण वाढल्यानंतर महाविद्यालय बदलून हवे असणारे होते. मात्र, बहुतेक विद्यार्थ्यांची तक्रार महाविद्यालय लांब असल्याची होती, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत ज्या विद्यार्थ्यांना शंका आहेत किंवा ज्यांना प्रवेश मिळू शकला नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जुलैला गरवारे महाविद्यालयात समुपदेशन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
‘प्रवेश प्रक्रिया सुरळीत झाली आहे. असलेल्या नियमानुसार शिक्षण विभागाकडून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. नियमानुसार प्रवेश न करणाऱ्यांबाबत कडक पावले उचलली जातील’
– सुमन शिंदे, विभागीय शिक्षण उपसंचालक