खंडाळ्यातील अमृतांजन पुलावरून उडय़ा मारण्याच्या नादात खाली पडत पर्यटकांचे वाढलेले अपघात रोखण्यासाठी या पुलाला सुरक्षा जाळ्या बसविण्याचे काम आयआरबी कंपनीच्या वतीने पूर्ण करण्यात आले आहे
रायगड व पुणे जिल्ह्य़ांना जोडणारा पूल म्हणून अमृतांजन पुलाचा नावलौकिक आहे. द्रुतगती महामार्ग बनविल्यानंतर या पुलाला समांतर नवीन पूल बांधण्यात आला होता. या नवीन व जुन्या पुलांच्या मध्ये साधारण पाच फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. खंडाळा डय़ूक्स नोज परिसरात पर्यटनासाठी येणारे युवा पर्यटक स्टंटबाजी करत नवीन पुलावरून जुन्या पुलावर उडय़ा मारत असत. हे स्टंट करण्याच्या नादात अनेक पर्यटकांचे द्रुतगती महामार्गावर पडून प्राण गेले आहेत, तर काही जण कायमचे अपंग झाले आहेत. वारंवार या घटना होत असल्यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी केली जात होती. मागील नोव्हेबर महिन्यात याच ठिकाणी एका दुचाकीवरून पडल्याने कर्जत तालुक्यातील दोनजण ठार झाले होते. अपघातांना कारणीभूत ठरलेल्या पुलाला दोन्ही बाजूने सुरक्षाजाळी बसविण्याचे मागणी अनेक वेळा झाली होती. मावळचे प्रांत अधिकारी यांनी देखील रस्ते विकास महामंडळ व आयआरबीला याबाबत सूचना केल्या होत्या. या सर्व घटनांच्या पाश्र्वभूमीवर मागील चार दिवसांपासून येथे जाळी बसविण्याचे काम आयआरबीने सुरू केले होते. ते काम आज पूर्ण झाल्याने या भागातील अपघातांना आळा बसेल अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.