शहरातील काही डेअरी उत्पादने विक्रेत्यांकडे कमी दर्जाच्या दूध व तुपाची विक्री होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे. अन्न विभागाने ठिकठिकाणच्या विक्रेत्यांकडून गोळा केलेले दूध व तुपाचे १७ नमुने कमी दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे.
एफडीएने दिवाळीत दूध, दुधाचे पदार्थ आणि मिठाईचा दर्जा तपासण्यासाठी मोहीम राबवली होती. या मोहिमेत गोळा करण्यात आलेले दुधाचे १४ नमुने, तर साजुक तुपाचे ३ नमुने कमी दर्जाचे असल्याची बाब समोर आली आहे. सहायक आयुक्त दिलीप संगत यांनी ही माहिती दिली. दुधाच्या नमुन्यांचे विश्लेषण केले असता त्यात स्निग्धांश आणि ‘एसएनएफ’चे (सॉलिड नॉट फॅट) प्रमाण कमी असल्याचे दिसले. तर, तुपाच्या नमुन्यांमध्येही घटक पदार्थाचे प्रमाण ठरलेल्या मानदांनुसार आढळले नाही. दुधाच्या तीन नमुन्यांमध्ये दूध पिशवीवर ‘बॅच क्रमांक’ तसेच ‘एक्सपायरी डेट’ही नमूद केलेले नव्हते.
संगत म्हणाले, ‘‘गाईच्या दुधात ३.५ टक्के स्निग्धांश तर ८.५ टक्के सॉलिड नॉट फॅट असायला हवे. तर म्हशीच्या दुधात ६ टक्के स्निग्धांश तर ९ टक्के एसएनएफ  असावे. दुधाचे विश्लेषण केल्याशिवाय स्निग्धांश व एसएनएफचे प्रमाण ओळखता येत नाही. मात्र अशा दुधात पाणी अधिक असते. दुधात अतिरिक्त पाणी आहे का हे तपासण्यासाठी ग्राहक उतरत्या ताटलीत दुधाचा थेंब टाकून तो थेंब वेगाने खाली ओघळतो का हे तपासू शकतील.’’
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार अन्नपदार्थ कमी दर्जाचे आढळल्यास विक्रेत्यावर दंडाची कारवाई केली जात असून ५ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद असल्याचेही संगत यांनी सांगितले.
बुंदीच्या लाडवांमध्ये खाद्यरंग जास्त
अन्न विभागाला बुंदीच्या लाडवांच्या दोन नमुन्यांमध्ये अति प्रमाणात खाद्यरंग वापरला गेल्याचेही आढळले आहे. मिठाईत ‘१०० पीपीएम’ (पार्टस् पर मिलियन) इतक्याच प्रमाणात खाद्यरंग वापरला जाऊ शकतो. परंतु एका मिठाईविक्रेत्याने लाडू बनवताना ३९५ पीपीएम खाद्यरंग वापरल्याचे विश्लेषणात दिसून आले. मिठाई अधिक आकर्षक दिसावी यासाठी काही विक्रेते अधिक प्रमाणात खाद्यरंग वापरण्याची शक्यता असते, तसेच काही लहान मिठाईविक्रेत्यांकडे खाद्यरंगाचे मोजमाप करण्याची साधने नसतात, असे संगत यांनी सांगितले.