शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) बाजारात उपलब्ध असलेल्या साहित्याची लाखोंच्या घरातील उलाढाल पाहिलेली बाजारपेठ या वर्षी मंदावली आहे. घटलेल्या प्रतिसादाचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी गाइड्स, प्रश्नसंच यांची विक्री जवळपास पन्नास टक्क्य़ांनी कमी झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून गेल्या वर्षी प्रथमच शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेबाबत असलेली उत्सुकता, नवीनच परीक्षा पद्धती या सगळ्यामुळे गेल्या वर्षी अनेक प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांना टीईटीच्या रूपाने लॉटरीच लागली होती. गेल्या वर्षी या टीईटीच्या साहित्याच्या बाजारपेठेत अवघ्या महिनाभरात लाखो रुपयांची उलाढाल झाली होती. मात्र, या वर्षी विद्यार्थ्यांकडून गाइड्ससाठीची मागणी घटली आहे. गेल्या वर्षीच्या अनुभवावरून मागणी नोंदवलेल्या अनेक विक्रेत्यांकडील प्रश्नसंच आणि गाइड्स तशीच आहेत. या वर्षी १४ डिसेंबरला टीईटी होणार आहे. पहिली ते पाचवी (प्राथमिक स्तर) आणि सहावी ते आठवी (उच्च प्राथमिक स्तर) अशा दोन स्तरांवर ही परीक्षा घेण्यात यते. प्राथमिक स्तरावरील परीक्षेसाठी पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमावर, तर उच्च प्राथमिक स्तरावरील परीक्षेसाठी पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. या वर्षी टीईटीसाठी नोंदणीही कमी झाली आहे. साधारण साडेतीन लाख विद्यार्थ्यांनी टीईटीसाठी नोंदणी केली आहे. कमी झालेला प्रतिसादाचा परिणाम गाइड्स आणि प्रश्नसंचांच्या बाजारपेठेवर झाला आहे. या वर्षी परीक्षेचे स्वरूप विद्यार्थ्यांना माहिती झाले आहे. त्याचप्रमाणे संकेतस्थळे, मोबाइल अॅप्लिकेशन्सचे प्रमाणही खूप वाढले आहे. टीईटीसाठी सध्या १५ ते २० मोबाइल अॅप्लिकेशन्स आहेत. त्याचाही परिणाम गाइड्सच्या विक्रीवर झाला आहे. गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी जवळपास पन्नास टक्क्य़ांनी विक्री कमी होत असल्याचे पुण्यातील उज्ज्वल ग्रंथ भांडार या दुकानातील विक्रेत्यांनी सांगितले.
बाजारात सध्या टीईटीसाठी मार्गदर्शन करणारी साधारण ५० पुस्तके उपलब्ध आहेत. राज्यातील २५ ते ३० प्रकाशन संस्था ही पुस्तके प्रकाशित करत आहेत. नव्या तीन ते चार प्रकाशनांनीही टीईटीचे प्रश्नसंच बाजारात आणले आहेत. मराठवाडय़ातील प्रकाशक ही पुस्तके काढण्यात आघाडीवर आहेत. साधारण ३५० ते ६०० रुपये या दरम्यान पुस्तकांच्या किमती आहेत. ‘गेल्या वर्षी पहिल्यांदाच परीक्षा झाली होती. त्यामुळे पुस्तकांना खूप मागणी होती. मात्र, या वर्षी परीक्षेबाबतची उत्सुकता थोडी कमी झाली आहे. त्यामुळे मागणी कमी झाली आहे,’ असे प्रगती बुक स्टोअरमधील विक्रेत्यांनी सांगितले.
 ‘गेल्या वर्षी विक्रेत्यांकडून दोन-तीन वेळा पुस्तकांसाठी मागणी नोंदवण्यात आली होती. मात्र, या वर्षी काहींनी मागणी कमी दिसत आहे. पुस्तकांबरोबरच सीडीज, ब्लॉग, संकेतस्थळे, मोबाइल अॅप्लिकेशन्स ही बाजारात आहेत. त्याचाही परिणाम पुस्तकांच्या मागणीवर झालेला असू शकतो. गेल्या वर्षी नवी पुस्तकेच विकत घ्यावी लागत होती. मात्र, या वर्षी वापरलेल्या पुस्तकांचा पर्यायही विद्यार्थ्यांना उपलब्ध असतो. त्याचाही परिणाम विक्रीवर होतो,’ असे विद्याभारती प्रकाशन संस्थेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.