भारतीय क्रिकेट निवड समिती अनेक वेळा आश्चर्याचे धक्के देण्याबाबत पटाईत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाच्या कर्णधारपदाची माळ अजिंक्य रहाणे या युवा खेळाडूकडे देण्यात आली आहे. खुद्द अजिंक्यलादेखील हा सुखदायक धक्का असेल. मात्र भावी काळाचा विचार करता निवड समितीचा हा निर्णय योग्य आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला सध्या संघाच्या अपयशाचे धनी व्हावे लागत आहे, तर कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही. तसेच कोहली हा मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेर जास्त गाजत आहे. साहजिकच भावी काळातील दौरे व मालिका यांचा विचार करताना भरवशाचा आणि कोणत्याही वादात न अडकलेला खेळाडूच भारतीय संघाच्या कर्णधारपदी असला पाहिजे, असा विचार निवड समिती सदस्यांनी केला असणार.
मुंबईचा युवा खेळाडू अजिंक्य हा खेळाच्या कोणत्याही स्वरूपात चपखल बसणारा आहे. कसोटी असो किंवा मर्यादित षटकांचे सामने असोत, अजिंक्य हा परिस्थितीनुसार खेळण्याबाबत ख्यातनाम मानला जातो. फलंदाजीत कोणत्याही क्रमांकावर पाठविले तरी तो हमखास चांगली कामगिरी करणार. भेदक  मानल्या जाणाऱ्या गोलंदाजांनाही पुढे येऊन उत्तुंग षटकार मारण्याची शैली त्याच्याकडे आहे. सामना अनिर्णीत ठेवण्यासाठी वेळकाढूपणा करण्याबाबतही तो माहीर आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये पॉवरप्लेच्या वेळी क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून फटकेबाजी करणे हा तर त्याच्या हातचा मळ असतो. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व व्ही. व्ही. एस. लक्ष्मण या तीनही फलंदाजांच्या विविध शैलींचे मिश्रण अजिंक्यकडे आहे असे मानले जाते. क्षेत्ररक्षणातही तो अतिशय निष्णात आहे.
अजिंक्यची निवड एका- त्याही झिम्बाब्वेच्या दौऱ्यासाठी आणि एकदिवसीय तसेच ट्वेंटी-२० सामन्यांसाठी झालेली आहे हे खरे; परंतु या निवडीमागे पुढच्या विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने आतापासूनच संघबांधणी केली पाहिजे, असा   निवड समितीचा दृष्टिकोन असू शकतो. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी  संघात बरेचसे युवा खेळाडू आहेत. त्यांच्याबरोबर योग्यरीतीने सुसंवाद ठेवण्यासाठी  युवाच कर्णधार असला पाहिजे, असाही विचार अिजक्यकडे कर्णधारपद देताना केला गेला         असावा. लहान वयात वरिष्ठ संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळत अनेक खेळाडूंनी कालांतराने कर्णधारपदाची कारकीर्द दीर्घकाळ केली आहे. अजिंक्य हा त्या कर्णधारांच्या मालिकेत बसला तर आश्चर्य वाटणार नाही.