गेल्या दोन-चार दिवसांतील राजकीय घडामोडी आणि नेत्यांची मुक्ताफळे ऐकली, तर शिवसेनेत सध्या काय सुरू आहे, असा प्रश्न कुणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो. परवा पुण्यात शिवसेनेचे खासदार आणि मोदी सरकारमधील मंत्री अनंत गीते यांनी संत ज्ञानेश्वरांचा संदर्भ देत ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’ असा ‘संदेश’ दिला आणि पाठोपाठ मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावरील ‘अखंड ज्योती’चा वाद उफाळून आला. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचे सरकार स्थापन झाले, तेव्हा शिवसेना हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष होता. काही दिवसांनी सेनेनेच सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेने असे का केले, हे कोडे नंतर बरेच दिवस अनेकांना सुटले नव्हते. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेना सत्तेत सहभागी झाली आहे, असा खुलासा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आणि परवा ते कोडे अंशत: सुटले. सत्तेत असलो, तरी शिवसेनेचे पूर्ण सरकार नाही, असेही ठाकरे म्हणाल्याने, सत्तेत असलेल्या सेनेच्या मंत्र्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाच होता. आपण सरकारमध्ये आहोत की विरोधात, हे कोडे इतरांप्रमाणेच त्यांनाही बहुधा छळत असावे. त्यामुळेच, सेनेचे पूर्ण सरकार नाही असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करताच, पहिला कंठ रामदास कदम यांना फुटला. आपण अधूनमधून सत्तेत आणि अधूनमधून विरोधात आहोत असा बहुधा त्यांचा समज झाला असावा. मंत्र्याच्या भूमिकेत असताना सरकारमध्ये आणि पक्षनेत्याच्या भूमिकेत असताना विरोधात असे दोन मुखवटे घेऊन बहुधा सेनेच्या मंत्र्यांना आता वावरावे लागणार आहे. त्याची चुणूक रामदास कदम यांनी दाखविली असावी. मुख्यमंत्री दोन नंबरचा- म्हणजे काळा- पसा घेतात असा थेट आक्षेपच त्यांच्या वक्तव्यातून ध्वनित झाला, तेव्हा ते पक्षाचे नेते या भूमिकेत असावेत. अनंत गीते यांच्या ‘ज्योत से ज्योत’ गीतापाठोपाठ शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिस्थळावरील ज्योत महापालिकेने लावायची, की कुणा प्रायोजकाने लावायची याचा तिढा निर्माण झाल्याने तो सोडविण्यासाठी शिवसेनेला आता पुन्हा नेमक्या भूमिकेची निवड करावी लागणार आहे. दरमहा ९० हजार रुपये खर्चून पालिकेने ही ज्योत जागविण्याचा वसा घ्यावा अशी बहुधा सत्ताधारी सेनेची अपेक्षा असावी. या अखंड ज्योतीस इंधनाचा वायुपुरवठा करण्यासाठी बहुधा प्रायोजक न मिळाल्याने अखेर गीते यांच्या संदेशाचे पालन करण्याची जबाबदारी पालिकेने उचलली असावी. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावरील ज्योत हा खरे तर वादाचा विषय होऊ नये. त्यांच्याविषयी सर्वच पक्षांत आदरभाव आहे. सामंजस्याने एखाद्या समस्येतून मार्ग काढल्याने समस्या सोपी होऊन जाते; पण त्यासाठी कोणत्या तरी एका भूमिकेशी ठाम असावे लागते. एकाच वेळी अनेक भूमिका घेण्याने संभ्रमच वाढतो, कार्यकत्रे गोंधळतात आणि प्रश्नांची गुंतागुंत वाढते. सत्ताधारी आणि विरोधक अशा दुहेरी भूमिकेच्या संभ्रमातून बाहेर पडून स्पष्ट भूमिका घेतली नाही, तर अगोदरच पदोपदी मानखंडना करणाऱ्या भाजपला आणखीच बळ येईल. तसे आता दिसायला लागलेच आहे.