आंतरराष्ट्रीय संबंध वाढविण्यात राजदूत, वाणिज्यदूत आणि या पदांवर नसलेले खास दूत किंवा सदिच्छादूतही महत्त्वाची भूमिका बजावतात. अलीकडेच सिंगापूरचे खास राजदूत व अनिवासी भारतीय व राजनैतिक अधिकारी गोपीनाथ पिल्लई (वय ७८) यांचा सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठाने विशेष सेवा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. त्यांना सिंगापूर सरकारने आंध्रमधील प्रकल्पांसाठी खास दूत याआधीच नेमले आहे. पिल्लई यांच्या मते जग फार वेगाने बदलते आहे व राजकीय जागरूकता वाढते आहे. पूर्वीच्या काळी तर फार गोंधळ असायचा. कुठलाही पेच कसा सोडवायचा हे समजत नव्हते, पण अनुभवातून बरेच शिकायला मिळाले, असे ते म्हणतात.
गोपीनाथ यांचा जन्म सिंगापूरला झाला. त्यांना आंतरराष्ट्रीय संबंधात रस होता व त्यामुळे विद्यापीठात असतानापासून त्याच दिशेने त्यांची पावले पडत होती. त्यांची बालपणीची आठ वर्षे केरळात गेली. नंतर त्यांनी मलाया विद्यापीठातून अर्थशास्त्र व इतिहास विषयात बीए पदवी घेतली. ते आधी रॉयटर्स या वृत्तसंस्थेत पत्रकार होते, पण तेथील सरकारने शिक्षक म्हणून काम केले पाहिजे, असे बंधन घातलेले असल्याने ते शिक्षक झाले. नंतर बँकॉक बँकेचे आर्थिक संशोधन अधिकारी, फार ईस्टर्न इकॉनॉमिक रिव्ह्य़ूमध्ये प्रतिनिधी, मलेशिया औद्योगिक विकास वित्त मंडळात अधिकारी अशी कामे त्यांनी केली.
सिंगापूर वेगळा देश झाल्यानंतर तेथे वांशिक दंगली झाल्या. त्यानंतर त्यांचे कुटुंब भारतात परतणार होते, पण काही कारणाने तसे झाले नाही. त्या वेळी त्यांनी सरकारच्या वस्त्रोद्योग विभागाची सूत्रे घेतली. गेटवे डिस्ट्रीपॅक, स्नोमन लॉजिस्टिक्स, विंडमिल इंटरनॅशनल अशा अनेक कंपन्याच्या संचालक मंडळांवर त्यांनी काम केले. काही काळ ते इराणमध्ये सिंगापूरचे अनिवासी राजदूत, पाकिस्तानमधील उच्चायुक्त होते. फ्रेंड्स ऑफ लेबर अ‍ॅवॉर्ड, मेरिटोरियस अ‍ॅवॉर्ड, पब्लिक सव्‍‌र्हिस स्टार अ‍ॅवॉर्ड व फ्रेंड ऑफ आयटी अ‍ॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. २०१२ मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन गौरवले आहे. गोपीनाथ पिल्लई यांचे वडील रामन गोपाळ पिल्लई ‘केरळ बंधू’ हे वृत्तपत्र सिंगापूरमध्ये चालवीत असत. सिंगापूरमधील अनेक संस्थांच्या माध्यमातून गोपीनाथ यांनी भारत-सिंगापूर मैत्रीचे धागे विणले. इन्स्टिटय़ूट ऑफ एशियन स्टडीजचे ते अध्यक्ष आहेत ‘द हिस्टरी ऑफ बँकिंग इन थायलंड’, ‘द पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ  साउथ एशियन डायसपोरा- पॅटर्न ऑफ सोशिओ- इकॉनॉमिक एन्फ्लुएन्स’ ही दोन पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.