भारतातील सुधारक मंडळींनीच नव्हे, तर संतसज्जनांनीही जातिव्यवस्थेवर कोरडे ओढले. गौतम बुद्ध, चक्रधर स्वामी यांच्यासारख्यांनी तर तिच्याविरोधात धार्मिक बंड केले होते. असे असताना आता एक इतिहासतज्ज्ञ दोन्ही बाहू उंचावून उठतो आणि जातिव्यवस्थेचा जयजयकार करतो, ही मोठी धाडसाचीच गोष्ट म्हणावयास हवी.
सर्वसाधारणपणे आपला सर्वाचाच जातीला विरोध असतो. जातिभेद, अस्पृश्यता, जातीयता हे सर्व समाजाला लागलेले शाप आहेत, यावर आपणा सर्वाचे एकमत असते. शिक्षण आणि नोकऱ्यांतील राखीव जागा या गोष्टींचा घटनात्मक आधार आíथक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण असला, तरी व्यवहारात त्या जातीच्या आधारावर दिल्या जातात. त्यालाही आपला विरोध असतो. या जात्याधारित राखीव जागांचे लाभार्थी आपण नसू, तर हा विरोध अधिकच तीव्र असतो आणि ‘राखीव जागांमुळेच समाजातील जातिभेद अधिक मुखर व प्रखर झाले आहेत, तेव्हा आता सगळ्याच जातींना टक्के वाटून द्या म्हणजे झाले’ अशी छद्मी सूचनाही खासगीत करीत असतो. पण काहीही झाले तरी आपण काही जातिव्यवस्थेचे समर्थन करीत नसतो. कारण तसे केल्यास आपण प्रतिगामी, वैचारिक मागासलेले ठरू असे भय आपल्या मनात असते. अशा परिस्थितीत एक इतिहासतज्ज्ञ दोन्ही बाहू उंचावून उठतो आणि जातिव्यवस्थेचा जयजयकार करतो, ही मोठी धाडसाचीच गोष्ट म्हणावयास हवी. वाय सुदर्शन राव असे या इतिहासतज्ज्ञाचे नाव असून अलीकडेच भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. ही त्यांच्या वैचारिक भूमिकेला सरकारने दिलेली मानवंदना आहे की काय हे अजून ठरायचे आहे. परंतु लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात झालेल्या उच्च-नीचतेच्या वादावरून नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे काँग्रेसला फटकारले, त्यावरून रावसाहेबांच्या नियुक्तीशी त्यांच्या वैचारिक भूमिकेचा संबंध नसावा असे मानण्यास हरकत नाही. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे सदस्य आहेत ही गोष्टही येथे गैरलागू मानता येईल. गुणकर्माधिष्ठित समाजव्यवस्थेच्या तत्त्वावर श्रद्धा असणारी मंडळी आता सत्तास्थानी आहेत. तेव्हा रावसाहेबांची इतिहास संशोधनातील गुणवत्ता पाहूनच त्यांना इतिहास संशोधन परिषदेचे अध्यक्षस्थान बहाल करण्यात आले आहे, असे मानण्यास प्रत्यवाय नाही. पण मुळात प्रश्न त्यांच्या परिषदेवरील नियुक्तीचा नाहीच. परिषदेचे काम प्रामुख्याने इतिहास संशोधनासाठी विविध संस्थांना निधीचे वाटप करणे हे आहे. त्या व्यवहाराआड आपली वैयक्तिक वैचारिक भूमिका कशी काय येऊ शकते, असा सवाल करून राव यांनी तो प्रश्नच उडवून लावला आहे. तेव्हा अशा संस्थांवरील नियुक्त्यांतील राजकारण चिवडत बसण्यापेक्षा राव यांचे जातीविषयक विचार समजून घेणे हे अधिक प्रबोधक आहे. कारण त्या सुविचारांत भविष्यातील सामाजिक क्रांतीची बीजे लपून बसलेली आहेत.
भारतातील सुधारक मंडळींनीच नव्हे, तर संतसज्जनांनीही जातिव्यवस्थेवर कोरडे ओढले. गौतम बुद्ध, चक्रधर स्वामी यांच्यासारख्यांनी तर तिच्याविरोधात धार्मिक बंड केले. पुढे दास कपिताल वगरे वाचून वामपंथी इतिहासकारांनी भारताच्या दुर्गतीला ही व्यवस्थाच कशी जबाबदार होती, असेही सिद्धांत मांडले. त्यामुळे आपणही समजून चाललो की जातिव्यवस्था खराबच. पण राव हे मात्र भारतातील जातिव्यवस्थेमधील चांगुलपणाचे खंदे समर्थक आहेत. त्यांच्या म्हणण्याचा आशय असा, की जातिव्यवस्था ही सामाजिक शोषणाची व्यवस्था होती. ती समाजातील विशिष्ट सत्ताधारी वर्गाचे आपले सामाजिक आणि आíथक दर्जा टिकवून ठेवण्याचे साधन होते, असे मानणे चुकीचे आहे. ही विकृत मांडणी आहे. उलट प्राचीन काळी भारतातील जातिव्यवस्था अतिशय चांगले काम करीत होती. सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत तत्कालीन समाजाच्या गरजा भागविण्याच्या हेतूने ही व्यवस्था उत्क्रांत होत गेली. ती वर्णव्यवस्थेशी एकात्म होती. अशा या व्यवस्थेविरोधात कोणाचीही काहीही तक्रार नव्हती. तसे उल्लेख कुठेही सापडत नाहीत. भारतीय संस्कृतीच्या या सकारात्मक बाजू आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या खोलवर रुजलेल्या आहेत. त्यामुळे प्राचीन व्यवस्थेतील त्या चांगल्या गोष्टींचे पुनरुज्जीवन करणे सहज शक्य आहे. हा खरा राव यांच्या विचाराचा गाभा आहे. आता राव यांनी गायलेल्या या जातींच्या ओव्यांमध्ये काय नवीन आहे, असा प्रश्न कोणाच्याही मनात येईल. कारण हे विचार यापूर्वीही अनेकांनी मांडले आहेत. भारतीय मन हे नेहमीच परंपरावादी राहिलेले आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती म्हणून जे जे काही आहे ते ते उत्तम, उदात्त, उन्नत आहे असे मानणारे काही कमी नाहीत. हे जे जे काही आहे त्यात अर्थातच जाती आणि वर्णव्यवस्था येते. चातुर्वण्र्य व्यवस्था हे तर भारताचे खास वैशिष्टय़. जातिव्यवस्था हे या व्यवस्थेचेच उपांग. पण जातिव्यवस्थेला नावे ठेवून चातुर्वण्र्य व्यवस्थेचा गौरव करण्याचीही एक पद्धत आपण कमावलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वेळोवेळी चातुर्वण्र्याचा चांगुलपणा गौरविला आहे. खुद्द गोळवलकर गुरुजींनी या व्यवस्थेचे समर्थन केले आहे. पण तसे करणारे ते एकटेच नाहीत. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे यांनीही ही आदर्श व्यवस्था असल्याचे म्हटले आहे. आदर्श का, तर ही व्यवस्था सहकार आणि सहयोगावर आधारलेली होती. ती संघर्षरहित आणि स्पर्धाशून्य होती. तर अशी ही आदर्श व्यवस्था आकाराला कधी आली? ऋग्वेद काळात तिची प्रक्रिया सुरू झाली असावी. ऋग्वेदातही पुरुषसूक्ताशिवाय अन्यत्र तिचा उल्लेख नाही. या सूक्ताप्रमाणे ब्राह्मण हे विराट-पुरुषाच्या मुखांतून, क्षत्रिय बाहूंतून, वैश्य मांडय़ांतून व शूद्र पायांपासून निर्माण झाले. याच पुरुषसूक्तात देवलोक, चंद्र-सूर्य, अग्नी, अंतरिक्ष, सर्व प्राणी, ऋषी असे बरेच काही पुरुषाच्या कुठल्या कुठल्या अवयवापासून निर्माण झाल्याचेही म्हटले आहे. तेव्हा ही सगळी अफाट कविकल्पनाच आहे. पण ती धूर्तपणे वर्णाच्या स्थाननिश्चितीसाठी वापरण्यात आली आणि हे चातुर्वण्र्य गुणकर्म विभागश: आहेत, असे गीतेमध्ये मांडून ही व्यवस्था आदर्श ठरविण्यात आली. पण यातील खरी मौज अशी, की चातुर्वण्र्य हे गुणकर्मावरून ठरत असले, तरी ते गेल्या जन्मातील. त्यामुळे ते जन्माधिष्ठितच होते. व्यवहारात जात हेच त्यांचे स्वरूप होते. तेव्हा चातुर्वण्र्याचा गौरव करताना नकळत सारे जन्मसिद्ध विषमतेचाच गौरव करीत असतात. त्यांची भाषा मात्र सोयीस्कर गुणकर्माची असते. ती जातिव्यवस्थेच्या बाजूची असते. राव यांचे प्रतिपादन अशाच प्रकारचे आहे. पण समजा चातुर्वण्र्याचे समर्थक म्हणतात त्याप्रमाणे ही व्यवस्था स्पर्धाशून्य आणि संघर्षशून्य अशी असेल, तर मग बिघडले कुठे? तिचे पुनरुज्जीवन करावे. रावांच्या मनातील जातिव्यवस्थेची सकारात्मक अंगे लागू करावीत. आजच्या काळात ते खूपच उपयुक्त ठरेल. पण रावांची समस्या अशी आहे, की ते जसे इतिहासतज्ज्ञ आहेत, तसेच किंचित कवीसुद्धा आहेत. त्यामुळे जातिव्यवस्थेबाबत त्यांनी जरा अधिकच कल्पनेच्या भराऱ्या मारल्या आहेत. या व्यवस्थेचे अधिष्ठान शोषण नव्हते, ही त्यांची अशीच एक मोठी काव्यमय बात. त्यांचे म्हणणे असे ती शोषणाधिष्ठित असती तर कोणी तरी तक्रार केलीच असती. तसे पुरावे काही दिसत नाहीत. डोळे झाकले की अंधारच होतो. तसेच हे. जातिव्यवस्थेत खालच्या स्तरावर असलेल्या जातींचे आक्रोश इतिहासाच्या पानापानांत भरलेले असताना, राव यांच्या कानावर त्यातील एक शब्दही येऊ नये, हे आश्चर्यच. जातिव्यवस्थेने भारतीय समाज आणि कुटुंबसंस्था कशी टिकवून धरली, या आनंदातच ते मग्न असावेत. अखेर समष्टी महत्त्वाची. तिच्यासाठी व्यक्तीने बलिदान केले तर काय मोठे? यात फरक एवढाच की येथे व्यक्तींचे जमावच्या जमाव बळी गेले आहेत.
परंतु तरीही राव यांच्या म्हणण्यानुसार ही व्यवस्था चांगलीच आहे. तिच्यातल्या वाईट गोष्टी तेवढय़ा दूर केल्या म्हणजे झाले. एकदा ते झाले की जातींचे उच्छेदन करण्याची वगरे काही गरजच नाही. बरे पुन्हा प्राचीन व्यवस्था आली म्हणजे मग ज्या त्या जातींनी आपापल्या पायरीवर राहणे आले. भेदाचा प्रश्नच उरणार नाही. सारे कसे समरस होईल.. अगदी रावांच्या मनासारखे.

Abhishek Ghosalkar, murder,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण : एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या सहभागाच्या दृष्टीने तपास केला का ? उच्च न्यायालयाची पोलिसांना विचारणा
BJP Demands Action, Against Sanjay Raut, for Insulting navneet rana , Campaign Speech, sanjay raut controversial statment, amravati lok sabha seat, lok sabha 2024, bjp, shivsena,
“वस्त्रहरणाच्या वेळी भीष्माचार्य, द्रोणाचार्य जसे चूप बसले तसेच काल संजय राऊत…”.
dhairyasheel mane criticizes raju shetty
“पाठिंब्यासाठी दुसऱ्याच्या पायऱ्या का झिजवत आहेत?”, खासदार माने यांची राजू शेट्टी यांच्यावर टीका
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र