संत चोखामेळा यांच्या रोमारोमांत विठ्ठलभक्ती कशी भिनली होती, याचा दाखला त्यांचे सद्गुरू संत नामदेव महाराज यांनीच एका अभंगात नमूद करून ठेवला आहे, असं हृदयेंद्र म्हणाला तेव्हा योगेंद्र उद्गारला..
योगेंद्र – ‘अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग’ हा किशोरीताई आमोणकरांनी गायलेला अभंग सोयराबाईंचा आहे.. या सोयराबाई म्हणजे चोखोबांच्या पत्नी ना?
हृदयेंद्र – (आनंदून) हो.. मीतूंपण गेले वायां। पाहतां पंढरीच्या राया।। काय अनुभव आहे! हे ऐकताना जणू आपलाही सगळा विचार एकच होऊन जातो.. चोखामेळा यांच्याही जीवनात विठ्ठलभक्तीचा एकच रंग भरला होता.. १३१३ सालातली घटना आहे. मंगळवेढय़ाच्या बादशहानं गावकूस बांधण्याच्या कामावर लोकांना जुंपलं, त्यात चोखामेळाही होते..
कर्मेद्र – गावकूस म्हणजे?
हृदयेंद्र – थोडं थांब.. (कपाटातून मराठी शब्दकोष शोधून काढतो) गांवकूस.. बरेचदा काय होतं, शब्द इतके परिचयाचे असतात की त्यांचा अर्थ आपल्याला येतोच, असं वाटत असतं. नेमका अर्थ मात्र सांगता येत नाही.. पहा.. गांवकूस म्हणजे गावाभोवतालची तटबंदी.. बरं तर ही तटबंदी बांधायला बादशहानं लोकं नेली.. आता सामाजिकदृष्टय़ा ज्याचं स्थान साधारण आहे त्याला एखाद्या कामाला नाही म्हणायचं स्वातंत्र्य सात शतकांपूर्वी कुठे होतं? तर चोखोबांनाही असंच नेलं गेलं.. ते गांवकूस कोसळलं आणि त्याखाली सर्व माणसं गाडली गेली.. त्यांच्यावर बहुदा तिथेच सामूहिक अंत्यसंस्कारही झाले असतील.. पण नामदेवांनी लिहून ठेवलंय की विठोबानं नामदेवांना सांगितलं की, ‘‘जा आणि चोखोबांच्या अस्थी घेऊन ये!’’.. देव म्हणे नाम्या त्वां जावें तेथें। त्याच्या अस्थि येथें घेऊनि याव्या।।.. नामदेवांनी विचारलं की इतकी हाडं असतील त्यातून चोखोबांची शोधू कशी? नाम्या म्हणे देवा कैशा ओळखाव्या।.. बघा हं.. हा प्रसंग तुमच्याआमच्यासाठी लिहून ठेवलाय नामदेव महाराजांनी तर विठोबांनी जे उत्तर दिलं, ते नामदेवांनी याअभंगात या प्रसंगासकट लिहून ठेवलंय. ते उत्तर असं.. ‘‘नाम्या म्हणे देवा कैशा ओळखाव्या। विठ्ठलनाम जयामध्यें निघे।।’’ विठोबा म्हणतात, अरे ज्या हाडांतून माझं नाम ऐकू येत असेल ना? ती हाडं माझ्या या चोखोबाची आहेत.. म्हणजे किती नामसाधना झाली असेल पहा.. (गाथेत पुन्हा चोखामेळा महाराजांचे अभंग शोधत..) हं, पहा.. काय म्हणतात? मोहळा मक्षिका गुंतली गोडीशी। तैशापरी मानसीं नाम जपे।। मधाच्या पोळ्याशी माशी जशी गुंतली असते ना, तसं तुझं मन नामजपाशी गुंतून जाऊ दे! मग काय होईल? मग तुज बंधन न पडे सर्वथा। रामनाम म्हणतां होसी मुक्त।। असं नाम झालं ना, तर मग बंधनच उरणार नाही..
कर्मेद्र – पण हे कसं शक्य आहे? नुसतं नाम तल्लीन होऊन घेतेलं तरी तेवढय़ानं बंधन कसं दूर होईल?
हृदयेंद्र – शेवटी इच्छा हेच बंधन आहे ना? आणि माझ्या अनंत इच्छा या मोहातूनच येत असतात.. तेव्हा मन इच्छांमध्ये गुंतलं असतं आणि त्यामुळे सदोदित हवेपणाच्या बंधनात अडकून असतं.. नामात जर ते गुंतलं तर अमुक व्हावं, अमुक होऊ नये, ही मनाची ओढच खुंटत जाईल, म्हणजेच बंधनाची कारणं आपोआप कमी होऊ लागतील.. जर मन पूर्ण नामातच गुंतलं तर मग इच्छांच्या पकडीतूनच सुटेल.. एका अभंगात चोखामेळा महाराज काय म्हणतात पहा.. वाढलें शरीर काळाचें हें खाजें। काय माझें तुझें म्हणतोसी।। बाळ तरुण दशा आपुलेच अंगीं। आपणची भोगी वृद्धपण।। शरीर वाढत आहे, पण ते अंती काळाच्याच मुखात जाणार आहे.. बालपण, तारुण्य ही या देहाचीच दशा आहे.. हेच शरीर जन्मलं, हेच शरीर बालकरूपात वावरलं, हेच शरीर तारुण्याच्या उन्मादात वावरलं हेच शरीर म्हातारपणही भोगणार आहे.. आपुला आपण न करी विचार। काय हें अमर शरीर याचें।। चोखा म्हणे भुलला मोहळाचे परी। मक्षिकें निर्धारी वेढियेला।। प्रत्येक दशेत हा शरीराशी एकरूप होऊन जगतोय, पण हे शरीर अमर आहे का? मगाशी नामात गुंतण्यासाठी मधमाशीचं रूपक वापरलं ना? आता तेच रूपक वापरून सांगतात की माशी जशी मोहळात गुंतते तसा देहबुद्धीच्या मोहळाला भुलून संसारात गुंतला आहे!
चैतन्य प्रेम