भारतीय ग्राहकांच्या बदललेल्या मानसिकतेचा अंदाज घ्यायचा असेल, तर संगणकीय बाजारपेठांमध्ये रंगलेल्या स्पर्धेकडे पाहावे लागेल. भारतीय ग्राहक हा तसा बऱ्यापैकी चोखंदळ. चार दुकानी फिरून, वस्तू हाताळून, घासाघीस करून त्या चार पैसे कमी दामाने पदरात पाडून घेणे यात त्याचे सौख्य सामावलेले असते. नव्वदोत्तरी आर्थिक क्रांतीने येथील मध्यमवर्गाच्याही हातात क्रेडिट आणि डेबिट कार्डे खुळखुळू लागली आणि त्याच्या खरेदीच्या पद्धतीत फरक पडला. याच काळात शहरोशहरी आधुनिक पद्धतीची दुकाने, महाबाजार यांचे पेव फुटले. त्याने घासाघीस प्रवृत्तीला आळा बसला आणि किमतीत सवलत, एकावर एक फुकट अशा योजनांनी भारावून आणि भुलून जाऊन लोक या दुकानी गर्दी करू लागले. याच्या पुढचे पाऊल इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या खरेदीचे होते. यातील प्रमुख फायदा म्हणजे दुकानदार नामक मध्यस्थाची संकल्पनाच त्यात बाद होती. त्यामुळे आपसूकच दुकानांपेक्षा येथे वस्तू स्वस्त पडत, पण त्या हाताळून पाहण्याचे सुख आणि सोय त्यात नव्हती. यावर मात करणे हे संगणकीय बाजारपेठेपुढील मोठे आव्हान होते. मात्र बन्सल बंधूंचे  फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या दोन कंपन्यांमध्ये या बाजारपेठेवरील वर्चस्वासाठी सुरू असलेली लढाई पाहता संगणकीय बाजारपेठेने ते आव्हान लीलया पेलले आहे, असे म्हणावे लागेल. अर्थात ही बाजारपेठ अजून विकासाच्या पहिल्या टप्प्यावरच आहे. आजमितीला देशातील किरकोळ बाजारपेठ सुमारे पाच हजार कोटी डॉलरएवढी आहे. त्यातला एक टक्का एवढाच भाग सध्या ऑनलाइन बाजारपेठेने व्यापला आहे. या तुलनेत चीन आपल्या कितीतरी पुढे आहे. चीनमधील अलिबाबा ही ऑनलाइन खरेदीची अक्षरश: गुहाच. चीनमधील संगणकीय बाजारपेठेचा सुमारे ८५ टक्के भाग या कंपनीच्या ताब्यात आहे. किंबहुना या बाजारक्षेत्रात या कंपनीची मक्तेदारीच आहे. आणि ही बाजारपेठही केवढी आहे? तर एका अंदाजानुसार या वर्षी ती १८ हजार कोटी डॉलरचा टप्पा पार करील. हे प्रमाण चीनमधील संपूर्ण किरकोळ बाजाराच्या ९ टक्के एवढे आहे. थोडक्यात, या क्षेत्रात यश मिळविण्याच्या दृष्टीने येथील कंपन्यांना दिल्ली खूपच दूर आहे; पण या बाजारपेठेचा एकूण आवाका, येथील ग्राहकांची वाढती क्रयशक्ती आणि अर्थातच खरेदीची बदललेली मानसिकता यामुळे या क्षेत्रात भक्कम पाय रोवण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्नशील आहेत. त्याच दृष्टीने फ्लिपकार्टने परवाच १०० कोटी डॉलरचा निधी जमा करून कंपनीमध्ये गुंतविला. फ्लिपकार्टप्रमाणेच गेल्या काही महिन्यांत किमान अर्धा डझन कंपन्यांनी असा निधी जमा केला आहे. याचे कारण या बाजारपेठेतील अमेझॉन या बहुराष्ट्रीय कंपनीचा प्रवेश. गेल्या वर्षी जूनमध्ये या कंपनीने भारतीय संगणकीय बाजारपेठेत आपलेही दुकान उघडले. २०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक घेऊन प्रवेशलेली ही कंपनी या वर्षांखेरीस १५०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात येते. या कालावधीत अमेझॉनने स्नॅपडील या कंपनीला चांगलीच धडक दिली. आज दुसऱ्या क्रमांकावर कोण, ही स्पर्धा संपल्यात जमा आहे. या दोन्ही कंपन्यांनी मिळून गेल्या वर्षभरात सुमारे ३६०० कोटी रुपयांची विक्री केली. पण फ्लिपकार्टने गेल्या आर्थिक वर्षांत यापुढे मजल मारली आहे. अमेझॉनला फ्लिपकार्टबरोबर स्पर्धा करायची तर केवढा मोठा पल्ला गाठावा लागणार आहे, याची कल्पना या आकडेवारीतून येते. अमेझॉनला त्याची अर्थातच कल्पना आहे. त्याचमुळे फ्लिपकार्टने १०० कोटी डॉलरचा निधी जमा करताच, दुसऱ्याच दिवशी अमेझॉनने आपल्या खात्यात २०० कोटी डॉलरची गुंतवणूक केली. याचा फायदा निश्चितच भारतीय ग्राहकांना होणार आहे. दोघांची स्पर्धा ग्राहकांचा लाभ हे बाजारगाडय़ाचे तत्त्वच असते.